Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:13 IST2025-10-16T12:12:47+5:302025-10-16T12:13:35+5:30
शेतात बिबट्याची तर गावात चोरांची दहशत; दोन कुटुंबांना चोरट्यांची मारहाण, दागिने लुटले

Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला
- नितीन कांबळे
कडा (बीड): आष्टी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी आधीच भयभीत असताना, आता चोरट्यांच्या वाढत्या हिंमतीमुळे नागरिक अधिकच धास्तावले आहेत. अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील अरणविहरा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि ३ तोळे सोने व रोख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अरणविहरा येथील नवनाथ जाधव आणि रावसाहेब जाधव या दोन शेतकऱ्यांची घरे अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत. नेहमीप्रमाणे जेवण करून गाढ झोपलेल्या या कुटुंबांना लक्ष्य करत चोरट्यांनी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बंद घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने आणि पैसे लुटल्यानंतर त्यांनी कुटुंबातील वृद्धांना धमकावले. वृद्ध दाम्पत्याने याला विरोध करताच, चोरट्यांनी अमानुषपणे त्यांना मारहाण केली. दागिने ओरबाडून घेत असताना महिलेच्या कानातील दागिने काढताना तिचा कान तुटला आणि नाकालाही गंभीर दुखापत झाली. पुरुषांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, गंभीर जखमी शेऊबाई नवनाथ जाधव, नवनाथ नारायण जाधव यांच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या गस्तीची मागणी
या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून, बिबट्याप्रमाणेच आता चोरटेही आपली 'गाव' बदलून दहशत माजवत असल्याचे दिसत आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी एकीकडे शेतात जाण्यास कचरत असताना, दुसरीकडे घरातही असुरक्षितता निर्माण झाली आहे. सरपंच अण्णासाहेब शिरसाठ यांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. एकीकडे हिंस्त्र पशू तर दुसरीकडे निर्दयी चोरटे, या दुहेरी संकटात नागरिकांनी जगायचे कसे?