बीड विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण; 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' म्हणणाऱ्या मैत्रिणीचा जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:43 IST2025-07-03T15:42:43+5:302025-07-03T15:43:42+5:30
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाशी निगडित कोणाच्या काही तक्रारी असतील तर समोर यावे, असे आवाहन केले आहे

बीड विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण; 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' म्हणणाऱ्या मैत्रिणीचा जबाब
बीड : शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थिनीचे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी लैंगिक छळ केला होता. हा प्रकार पीडितेने मैत्रिणीला सांगितला होता. या वेळी 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो', असे ती म्हणाली होती. या प्रकरणात आता तिच्यासह इतर मुलींचे जबाब घेतले जात आहेत. महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष पथक हे काम करत आहे. त्यांच्यासमवेत मानसोपचार तज्ज्ञाचीही नियुक्ती केली आहे.
विद्यार्थ्यांचा छळ केल्याप्रकरणी २६ जून रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा तपास अधिकारीही बदलण्यात आले होते. आधी दोन दिवस आणि नंतर पाच दिवसांची आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. हे प्रकरण पहिल्याच दिवशी अधिवेशनात गाजले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण राज्यभरात चर्चेला आले आहे.
दोघांचेही मोबाइल जप्त
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दाेघांचेही मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर या अगोदर दोघांचेही चारचाकी वाहने जप्त केली होती. मोबाइलमधील डाटा रिकव्हरसाठी फॉरेन्सिकला पाठविला जाणार असल्याचे पाेलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.
२०२३ मध्ये मुलीचा छळ
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाशी निगडित कोणाच्या काही तक्रारी असतील तर समोर यावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर एका पालकाने त्यांची भेट घेत २०२३ मध्ये पवारच्या इंग्लिश स्कूलमध्ये छळ झाल्याचे म्हटले होते. याच्या चौकशीसाठी एक अधिकारी नियुक्त केले आहेत. तर इतर कोणीही आणखी पुढे आले नसल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांपासून जबाब घेणे सुरू
या प्रकरणाशी संबंधित पीडितेच्या मैत्रिणी आणि इतर काही लोकांचे गोपनीय जबाब घेतले जात आहेत. यासाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक आहे. १८ वर्षांखालील मुली असल्याने या पथकात मानसोपचारतज्ज्ञांचीही नियुक्ती केल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसआयटीची घोषणा केली आहे, पण अद्याप आमच्यापर्यंत काही आले नाही. आमचा तपास गतीने सुरू असून जबाब घेणे सुरू आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या उपस्थितीत काही जबाब घेतले जात आहेत.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड