Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:18 IST2025-12-15T12:16:53+5:302025-12-15T12:18:29+5:30
Beed Crime: धारूर पोलिस ठाण्यात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक
धारुर (जि. बीड) : ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात दोन व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास धारूर घाटातील म्हसोबा मंदिराजवळ घडली. या दगडफेकीत ससाणे यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत तसेच गाडीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. धारूर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन करवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात माजलगाव पोलिस ठाण्यात भेट देऊन मंगेश ससाणे हे केजकडे परतत होते. यावेळी धारूर घाटात अचानक समोरून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर सात ते आठ दगड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ससाणे थोडक्यात बचावले. हल्लेखोर दगडफेक करून घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर मंगेश ससाणे यांनी तत्काळ धारूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धारूर ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे करीत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे. ओबीसी नेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.