'एसटी'तील वादग्रस्त अधिकाऱ्याचा दक्षता समितीसोबत ‘प्रवास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:23 PM2019-08-13T17:23:01+5:302019-08-13T17:30:10+5:30

मुंबईत जावून वरिष्ठांचीही घेतली भेट

In Beed, 'ST' controversial officer 'travels' with vigilance committee | 'एसटी'तील वादग्रस्त अधिकाऱ्याचा दक्षता समितीसोबत ‘प्रवास’

'एसटी'तील वादग्रस्त अधिकाऱ्याचा दक्षता समितीसोबत ‘प्रवास’

Next
ठळक मुद्देन्यायाबाबत साशंकता डीसींना उशिराची जाग; अखेर पत्र दिले

बीड : सहकारी महिला कर्मचाऱ्याने तक्रार केलेल्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू असतानाही त्याला सोबत घेऊन चक्क दक्षता समितीचे अधिकारी मुंबई प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन फिरणारे समितीचे अधिकारीच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दक्षता समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचे समोर आले होते. आलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यात दक्षता समिती अयशस्वी ठरली आहे. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी एका प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाच दिवसात देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला समितीने केराची टोपली दाखविली. विशेष म्हणजे दिरंगाई होत असतानाही विभागीय नियंत्रकांनी समितीला साधी नोटीसही बजावली नव्हती. त्यामुळे नियंत्रक आणि समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दरम्यान, ज्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार आहे, तोच समितीचा ‘नायक’ असलेल्या अधिकाऱ्याला घेऊन मुंबईला गेला. येथे मंत्र्यांच्या जवळच्या व रापमतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ‘आंबट’-गोड गप्पा मारल्या. त्यामुळे समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. समितीचे अधिकारीच आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या लोकांबरोबर खुलेआम फिरत असल्याने संशय वाढला आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेमध्ये मात्र भितीचे वातावरण असून ती आता याविरोधात आवाज उठविणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

म्हणे, कार्यालयीन बैठक होती
समितीचा ‘नायक’ असलेला आणि त्या अधिकाऱ्यासोबत ‘आंबट’ गोड गप्पा मारणाऱ्या अधिकाऱ्याला संपर्क केला. आपली कार्यालयीन बैठक असल्याचा खुलासा त्यांनी केला. सूत्रांच्या माहितीनुसार हा ‘नायक’ आणि तो अधिकारी हे मुंबईला जातानाही एकाच बसमध्ये गेल्याचे समजते.

डीसींना उशिराची जाग; अखेर पत्र दिले
दक्षता समितीने चौकशीत उशिर करूनही विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी त्यांना कसलीच नोटीस बजावली नव्हती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच डीसींना जाग आली. त्यांनी तात्काळ पत्र देऊन तीन दिवसात आहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांची धाव
या गंभीर प्रकरणाबाबत रापम अनभिज्ञ असल्याचे दिसत होते. मंगळवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले आणि तत्वशील कांबळे यांनी डीसींची भेट घेतली. यावेळी केलेल्या मागणीवर आणि प्रश्नांचे एकही उत्तर डीसींना देता आले नाही. 

समितीच्या सदस्याला घेऊन गुफ्तगू
दक्षता समितीतील एक एक करून सर्वांना त्या अधिकाऱ्याने  आपल्या जाळ्यात ओढले आहे. चौकशी सुरू असतानाही समितीत असणाऱ्या अशासकीय सदस्याने त्या अधिकाऱ्यासोबत कक्षात जावून तासभर चर्चा केल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. समितीच त्या अधिकाऱ्यासोबत गुफ्तगू करू लागल्याने न्याय मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: In Beed, 'ST' controversial officer 'travels' with vigilance committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.