मस्साजोगमध्ये उलटफेर; जाणून घ्या अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुखांना किती मते पडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:04 IST2026-04-29T20:03:11+5:302026-04-29T20:04:04+5:30
मस्साजोगचा निकाल: ९ मतांची जुनी कसर भरून काढत स्वरूपानंद देशमुख झाले सरपंच; राज्याचे लक्ष लागलेली लढत संपली

मस्साजोगमध्ये उलटफेर; जाणून घ्या अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुखांना किती मते पडली?
- मधुकर सिरसट
केज (जि. बीड): दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर १५ महिन्यांनी रिक्त झालेल्या मस्साजोग सरपंचपदासाठी मंगळवारी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. बुधवारी सकाळी केज येथील तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९१४ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या अश्विनी संतोष देशमुख यांना ८२२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष करंजवणकर यांनी स्वरूपानंद देशमुख यांना ९२ मतांनी विजयी घोषित केले.
बिनविरोधचे प्रयत्न का फसले?
अश्विनी देशमुख यांची निवड बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद यांनी या पोटनिवडणुकीत आपली महत्त्वाकांक्षा सिद्ध केली.
मतदानाची आकडेवारी आणि निकाल
गावातील एकूण २,०८४ मतदारांपैकी १,७४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता (८३.६९ टक्के). यामध्ये ९३९ पुरुष आणि ८०५ महिला मतदारांचा समावेश होता. मतमोजणीसाठी तहसील कार्यालयात तीन टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रक्रियेवेळी तहसीलदार अशोक भंडारे आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात होता.
न्यायासाठी संतोष देशमुख कुटुंबासोबतच राहणार: स्वरूपानंद देशमुख
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. "मी परळीतून पैसे आणले, असा खालच्या पातळीचा आरोप माझ्यावर झाला, पण मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी यापुढेही त्यांच्या कुटुंबासोबत कायम राहीन," असे भावनिक आवाहन नवनिर्वाचित सरपंचांनी केले.