Beed Crime: आई सोडून गेली, बापही झाला वैरी; १४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:14 IST2025-06-26T12:10:32+5:302025-06-26T12:14:05+5:30

Beed Crime News: चाइल्ड लाइनने केली हेल्प : निर्दयी बाप म्हणाला मुलीला फेकून द्या

Beed: Mother left, father also became enemy; 14-year-old girl's 'exile' | Beed Crime: आई सोडून गेली, बापही झाला वैरी; १४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास’

Beed Crime: आई सोडून गेली, बापही झाला वैरी; १४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास’

बीड : आई गेली आणि दारूच्या व्यसनाने वडिलांना ग्रासले. चौदा वर्षांच्या मुलीच्या नशिबी आलेला वनवास काळज चिरणारा आहे. तिला वडिलांकडून फक्त मारहाण केली जात होती. जेव्हा ‘चाइल्ड लाइन’ मदतीला धावली, तेव्हा त्याच बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे सांगितले. पण, या भीषण परिस्थितीत, ‘चाइल्ड लाइन’ने मदत करत तिला बालगृहाचा आधार दिला.

बीड तालुक्यातील एका कुटुंबात पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक चुलता राहत होते. कोविड काळात दोन्ही मुलींना सोडून त्यांची आई घर सोडून निघून गेली. या घटनेमुळे मुलींचे वडील तणावाखाली आले आणि दारूच्या आहारी गेले. त्यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी मुंबईतील आजीकडे गेली, तर १४ वर्षीय मुलगी वडिलांसोबतच थांबली. पण दारूड्या वडिलांकडून तिला मारहाण होऊ लागली. चुलत्याला बोलता येत नसल्याने, वडील त्यालाही मारहाण करत असे. वडिलांच्या मारहाणीमुळे पीडित मुलगी नातेवाइकांकडे निघून गेली. काही दिवसांनी ती परत आल्यानंतरही तिला पुन्हा मारहाण झाली. हेच चाइल्ड लाइनला समजले आणि त्यांनी तातडीने धाव घेत हेल्प केली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी एफ.एम. शेख आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रकल्प समन्वयक अश्विनी जगताप, सुपरवायझर प्रसाद पवार, स्वप्नील कोकाटे, विजया जाधव आणि पोलिस कर्मचारी रंजना बरडे यांनी ही कारवाई केली.

बाप म्हणतो, मुलीला घेऊन जा अन् तिकडेच फेकून द्या
चाइल्ड हेल्प लाइनच्या टीमने बालिकेच्या घरी धाव घेतली. मुलीच्या आजीसह इतरांचे जबाब घेतले. यावेळी बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे बेजबाबदार वक्तव्य केले. हे ऐकून मुलगी घरात असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

चाइल्ड लाइनचा पुढाकार, बालिका बालगृहात
चाइल्ड हेल्प लाइनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने १४ वर्षीय पीडित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. बीड जिल्हा बालकल्याण समितीने मुलीची व्यथा समजून घेतली आणि बालगृहामध्ये दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, या बालिकेला बीडमधील एका बालगृहात दाखल करण्यात आले असून, तिचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे.

Web Title: Beed: Mother left, father also became enemy; 14-year-old girl's 'exile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.