Beed: वृद्ध महिलेचे कान तोडून दागिने पळविले; लाडेवडगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:50 IST2025-06-19T19:49:08+5:302025-06-19T19:50:19+5:30
वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे फूल निघत नाही असे लक्षात येताच चक्क कान तोडून दागिना चोरट्यानी पळविला.

Beed: वृद्ध महिलेचे कान तोडून दागिने पळविले; लाडेवडगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ
- मधुकर सिरसट
केज (बीड) : तालुक्यातील लाडेवडगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करुन ७३ हजार रुपयांचे दागिने तोंडावर कपडा बांधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना बुधवारी ( दि. १८) पहाटे २ वाजता घडली. वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे फूल निघत नाही असे लक्षात येताच चक्क कान तोडून दागिना चोरट्यानी पळविला. या प्रकरणी समाबाई तुकाराम लाड ( ८०, रा लाडेवाडगाव) यांच्या फिर्यादीवरून चार चोरट्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
समाबाई व त्यांचे पती तुकाराम लाड हे दोन दिवसापूर्वीच आडस रस्त्यालगत आसलेल्या लवणं नावाच्या शेतात राहायला गेले होते. मंगळवारी ( दि. १८ ) जेवण करुन ते आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. दरम्यान, बुधवारी पहाटे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान तुकाराम लाड यांना चोरटे शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने समाबाई लाड यांना जाग आली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ आणि कानातील फुले, असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला.
कानाला हिसका देऊन फूल तोडून नेले
चारही चोरट्यांच्या चेहऱ्यावर कपडा बांधलेला होता. कानातील फुल निघत नसल्याने चोरट्याने कानाला हिसका देऊन ते लुबाडून घेतले त्यामुळे समाबाई यांच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. येथून गेल्यानंतर एका ढाब्यावर ही चोरट्यानी डल्ला मारला आहे. त्या ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी लोकमतशी बोलताना दिली.