Beed: लेकीला अडीच लाखात विकलं! १२ वर्षांच्या चिमुकलीशी २६ वर्षांच्या तरुणाचा बालविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:03 IST2026-01-27T19:01:58+5:302026-01-27T19:03:11+5:30
लग्नानंतर पूजेचा घाट घातला अन् सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने 'पाप' उघड झालं.

Beed: लेकीला अडीच लाखात विकलं! १२ वर्षांच्या चिमुकलीशी २६ वर्षांच्या तरुणाचा बालविवाह
केज (बीड): छत्रपती संभाजीनगरच्या नागेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अडीच लाख रुपये देऊन मुलीशी बालविवाह केल्याची घटना समोर आली आहे. माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था सचिवांच्या प्रयत्नाने या बालविवाहाचे बिंग फुटले असून केज तालुक्यातील नवरदेवाला बरोबर घेऊन मध्यस्थी फरार झाला आहे.
केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील विठ्ठल सुदामराव बसवर या २६ वर्षीय तरुणाने नागेवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील वडीलांना २ लाख ५० हजार रुपये देऊन त्यांच्या १२ वर्षांच्या अज्ञान मुलीशी बालविवाह केल्याची घटना घडली असून माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवा भावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांच्या प्रयत्नाने बालविवाहाचे बिंग फुटताच नवरदेवाला घेवून मध्यस्ती फरार झाले आहेत..
छत्रपती संभाजीनगर येथील नागेवाडी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील विठ्ठल सुदामराव बसवर (वय २६) या तरुणासोबत आठ दिवसांपूर्वी अज्ञात ठिकाणी झाला होता. २२ जानेवारीला पन्हाळवाडीत या नव दाम्पत्याचा सत्यनारायण झाला. याची माहिती मिळताच त्याच दिवशी माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवा भावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांनी केजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याशी संपर्क साधून बालविवाहाची माहिती दिली होती. पन्हाळवाडीत सत्यनारायण झाला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे ते रिकाम्या हाताने परतले.
मुलीच्या मामासह मध्यस्थीने ५० हजार लाटले...
बालविवाह जुळवण्यात मुलीच्या छत्रपती संभाजीनगर येथील मामाने २० हजार रुपये तर पन्हाळवाडी येथील मध्यस्थी अशोक बसवर याने ५० हजार रुपये लाटले असून २ लाख रुपये मुलीच्या वडिलांना देण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश..
या प्रकरणी सत्यभामा सौंदरमल यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे काही पुरावे देऊन पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी केज पोलिस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक व्यंकराम यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.