Beed: माहेरी निघून जा म्हणत, महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी, पतीचाही सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:34 IST2025-08-12T13:30:25+5:302025-08-12T13:34:47+5:30
सुरुवातीला धमक्यांमुळे गंभीर जखमी महिलेने जबाब बदलला होता; पण आता तिने सत्य सांगितले आहे.

Beed: माहेरी निघून जा म्हणत, महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी, पतीचाही सहभाग
गेवराई : कौटुंबिक वादातून सवतीच्या भावाने गावठी बंदुकीतून गोळी झाडून एका महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे शनिवारी (दि. ९) सायंकाळी घडली होती. विशेष म्हणजे, पती संदीप भोसले यानेही मारहाण करत या हल्ल्यात सवतीला साथ दिली. गंभीर जखमी झालेल्या महिलेने रुग्णालयातून दिलेल्या जबाबानंतर पती, सवत आणि इतर चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल संदीप भोसले (२२) हिने दिलेल्या जबाबानुसार, सवत रुचिका संदीप भोसले हिचा तिच्यावर राग होता. ९ ऑगस्ट रोजी रात्री राख्या घेऊन परत येत असताना रुचिकाने शीतलला अडवले. वाद मिटवण्याच्या बहाण्याने पती संदीप दोघींना पांढरवाडी रस्त्यावर घेऊन गेला. तेथे रुचिकाचा भाऊ सावऱ्या ऊर्फ शावरी नवनाथ काळे, अतुल नवनाथ काळे, बहीण नाथा नवनाथ काळे आणि बंदू भांड्या चव्हाण यांनी शीतलला घेरले. या सर्वांनी शीतलला मारहाण केली. यात पती संदीपचाही समावेश होता. त्यानंतर सावऱ्या ऊर्फ शावरी काळे याने गावठी बंदुकीतून शितलच्या पाठीत गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला धमक्यांमुळे तिने जबाब बदलला होता; पण आता तिने सत्य सांगितले आहे. तिच्या जबाबानंतर पती संदीप ईश्वर भोसले, सवत रुचिका संदीप भोसले, सावऱ्या ऊर्फ शावरी काळे, अतुल काळे, नाथा काळे आणि बंदू चव्हाण यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सवतीला घेतले ताब्यात
जखमी शितलची सवत रुजिका हिला पोलिसांनी गेवराई तालुक्यातून ताब्यात घेतले आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. यात संदीप भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. तसेच इतर आरोपींवरही चोरी, घरफोडीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.