Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:16 IST2025-07-04T12:15:29+5:302025-07-04T12:16:30+5:30
केज तालुक्यातील घटनेने खळबळ, गुन्हा दाखल

Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप
केज : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी केज तालुक्यात पाण्याच्या टाकीवर चढून पाच महिन्यांपूर्वी आंदोलन करणाऱ्या समर्थक नानासाहेब चौरे या तरूणाने मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केली आहे.
२ जूलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अविवाहित असलेली मतिमंद तरुणी तिच्या भावजयसोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्राजवळील गोठ्यात एकटी थांबली होती. ही संधी साधून आरोपी नानासाहेब भानुदास चौरे (वय ४०) याने तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी २ जूलै रोजी रात्री १० वाजता पीडित मुलीने केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पीडितेची वैद्यकीस तपासणी झाली असून तपास पिंक पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.
आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे
नानासाहेब चौरे याच्याविरुद्ध या पूर्वीही लैंगिक अत्याचार, बालकांचे शोषण, ॲट्रॉसिटीसह, अवैध दारू विक्री अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल आहेत. एका लैंगिक अत्याचारच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे, तर एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली आहे.
नागरिकांच्या मारहाणीत आरोपी जखमी
मतिमंद मुलीवर अत्याचार करताना तिच्या भावजयने पाहून आरडाओरडा केल्याने जमा झालेल्या नागरिकांनी आरोपी नानासाहेब चौरे याला बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार केले जात आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिली.