बीड हादरले! वाढदिवस साजरा करताना वाद, रागात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 21:19 IST2025-09-25T21:16:16+5:302025-09-25T21:19:46+5:30
Beed Crime: बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागातील घटनेने खळबळ; आरोपी अर्ध्या तासात जेरबंद

बीड हादरले! वाढदिवस साजरा करताना वाद, रागात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला
बीड : शहरात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका (वय २२, रा. बीड) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी रात्री शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिक आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा कसलाही धाक राहिला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात सूरज आप्पासाहेब काटे (वय २१, रा. बीड) या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक दुबाले, राहुल शिंदे आणि मनोज परजणे यांनी केली.
महिन्यापूर्वीही झाला होता वाद
यश आणि सूरज या दोघांमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते, त्यामुळे त्यांच्यात खुन्नस (वैर) होती. बुधवारी रात्रीही माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात वाद झाले. यावेळी सूरजने सोबत असलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तर सूरज हा फरार झाला होता.