चोरीचा डाव अंगाशी आला, बीडमध्ये टॉवर कोसळून तारा चोरणाऱ्या पुण्याच्या दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:25 IST2026-03-30T16:25:09+5:302026-03-30T16:25:54+5:30
तारांच्या चोरीसाठी पुण्यातून आले अन् जीव गमावून बसले; केज तालुक्यातील दुर्घटनेने उडाली खळबळ.

चोरीचा डाव अंगाशी आला, बीडमध्ये टॉवर कोसळून तारा चोरणाऱ्या पुण्याच्या दोघांचा मृत्यू
- मधुकर सिरसट
केज (बीड): धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील नांदूरघाट शिवारात विजेच्या तारांची चोरी करण्याच्या प्रयत्नात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हायव्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढून एका बाजूची तार तोडताच, टॉवर विरुद्ध दिशेला कोलमडून पडल्याने ही भीषण दुर्घटना घडली. रविवारी (दि. २९) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन तरुण जागीच ठार झाले, तर त्यांचे दोन साथीदार थोडक्यात बचावले आहेत.
अविनाश बटोळे (वय १७) आणि आकाश श्रीराम आडे (दोन्ही रा. मेदनकरवाडी, चाकण, जि. पुणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चोरीचा बनाव अन परभणीत 'हायव्होल्टेज' ड्रामा
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चाकण परिसरातील सहा जण एका कारमधून चोरीच्या उद्देशाने नांदूरघाट शिवारात आले होते. 'टोरँटो' कंपनीच्या टॉवरवरील तारा कापण्यासाठी चौघे जण वर चढले, मात्र टॉवर कोसळल्याने दोघांचा अंत झाला. घटनेनंतर घाबरलेल्या साथीदारांनी अपघाताचा बनाव रचला आणि दोन्ही मृतदेह कारमध्ये टाकून थेट परभणी गाठली. तिथे मृतदेह सोडून साथीदार पसार झाले, मात्र नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने या संपूर्ण चोरीचे बिंग फुटले.
फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिथे रक्ताचे डाग, पादत्राणे आणि पाण्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्या. बीड येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाला भेट देऊन रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांचा कसून तपास सुरू
या प्रकरणात कार चालक सुरज राजू गिराम याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. पुण्यातून बीडमध्ये येऊन अशा प्रकारे विजेच्या तारांची चोरी करणारी ही टोळी मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात भीतीसह चर्चेला उधाण आले असून, पोलीस आता पसार झालेल्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.