ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:59 IST2025-07-09T11:58:30+5:302025-07-09T11:59:09+5:30
पोलिसच चोर! सहायक फौजदारानेच चोरल्या ७ दुचाकी आणि ५८ बॅटऱ्या

ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर
बीड : बीड पोलिस नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. वायरलेस विभागातील सहायक फौजदाराने डिसेंबर २०२४ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातून १२ व्होल्टच्या ५८ बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी चाेरल्या. ड्रीम एलेव्हन व रमी ॲपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हा पोलिस चोर बनल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली.
अमित मधुकर सुतार (वय ३५, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार), स्वराज कोंडीराम बोबडे (२६, रा. अंबिका नगर, बीड) आणि हितोपदेश गणेश वडमारे (३०, रा. अंकुशनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सुतार हा सहायक फौजदार असून, पोलिस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता. २४ डिसेंबर २०२४ रोजी सुतार याने इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्या. त्याच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अधिक तपास केल्यावर त्याच्याकडे तब्बल ५८ बॅटऱ्या निघाल्या. शिवाय एक एलईडी टीव्हीही चोरला होता. सुतारला तेव्हा अटकही झाली होती. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्याचे निलंबनही केले होते. तो सध्या जामिनावर होता. परंतु त्याला जुगार, दारू, ऑनलाइन जुगार, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठीच त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे सांगण्यात आले.
दुचाकी विक्रीसाठी दोघांची मदत
सुतार याने बीड शहर दोन व शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरल्या. त्या विक्रीसाठी त्याने स्वराज आणि हितोपदेश यांची मदत घेतली होती. हीच माहिती एलसीबीला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. सुतारने तीन दुचाकी स्वत:च्या घरी, चार मित्राकडे लपवल्या होत्या. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघड झाले आहेत.
जालन्यातही पीएसआय चोरटा
जालना येथेही प्रल्हाद मांटे हा चोरांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचे एप्रिल २०२५ मध्ये समोर आले होते. त्यातही अहमद शेख नावाचा चोरटा बीडचाच रहिवासी होता. जालन्यानंतर बीडमध्येही पोलिसाचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक तपास सुरू आहे
तीन चोरट्यांकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ते सध्या बीड शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणखी तपास सुरूच आहे.
- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड