Beed Crime: लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला मारहाण; व्हिडीओ बनवला, तोंडावर लघुशंका केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:24 IST2025-09-25T16:24:58+5:302025-09-25T16:24:58+5:30
हा हल्ला म्हणजे दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न होता; लक्ष्मण हाके यांचा आरोप

Beed Crime: लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला मारहाण; व्हिडीओ बनवला, तोंडावर लघुशंका केली
माजलगाव (बीड) : ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्याला माजलगावमधील एका हॉटेलमध्ये मारहाण करून व्हिडीओ बनवला. त्यानंतर अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये लावलेल्या राष्ट्रवादीच्या आ. विजयसिंह पंडितांच्या फोटोवरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी हॉटेलमालकासह सातजणांवर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी प्रा. हाके यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपीच्या अटकेची मागणी केली.
पवन पांडुरंग करवर (वय २९, रा. केरवाडी, जि. परभणी) हे मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसोबत माजलगावकडील गढी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. हॉटेलमध्ये विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहून त्यांनी जेवणाची ऑर्डर रद्द केली. यामुळे संतापलेल्या हॉटेलमालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी 'मराठ्यांना शिव्या देतो का?' असे म्हणून पवनवर लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात पवनच्या डोक्याला, हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली. मारहाणीदरम्यान, हल्लेखोरांनी 'आमदार साहेबांना मारणारा हाच होता, गाडीवर नाचणारा' असे म्हणत पवनला मारले. हल्ल्याच्या भीतीने पवनचे मित्र तिथून पळून गेले. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी मोबाइलवर शूटिंग करत पवनला मारहाण केली आणि त्याच्या तोंडावर लघुशंका केली.
दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न : लक्ष्मण हाके
प्रा. लक्ष्मण हाके यांनी माजलगाव येथील हल्ल्यासंदर्भात पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन गंभीर आरोप केले आहेत. "हा हल्ला म्हणजे दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न होता," असे ते म्हणाले. हल्ल्यातील आरोपी प्रवीण जगताप आणि नितीन जगताप हे वाळू माफिया असून, आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी, हल्ल्याची माहिती देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळेच हा प्रकार घडला. "बीडमध्ये पोलिसांचा आणि प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नाही," असा थेट आरोप करून त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.