केज-अहिल्यानगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; माजी सैनिकासह ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:24 IST2026-03-11T12:24:19+5:302026-03-11T12:24:49+5:30
दोन कारच्या भीषण धडकेत ५ जण रक्ताच्या थारोळ्यात, पोलिसांची धाव

केज-अहिल्यानगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; माजी सैनिकासह ५ जण जखमी
केज (जि. बीड): अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात मंगळवारी दुपारी दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड (रा. चिंचोली माळी) आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने (रा. बीड) हे स्विफ्ट डिझायर कारने (MH-44 S-7432) बीडकडे जात होते. याचवेळी बीडकडून केजकडे येणाऱ्या टाटा अल्टो कारची (MH-23 BH-6566) आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
पोलीस आणि ग्रामस्थांची तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने पाचही जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये शिवराज माने, रवी शिंदे, अनिल मोरे (सर्व रा. बीड) आणि माजी सैनिक मधुकर गायकवाड यांचा समावेश आहे. अनिल मोरे आणि सिद्धेश्वर आदमाने यांना अधिक उपचारासाठी बीडला पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. सुशील पवार यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.