Beed: गुलजार-ए-रजा नावाने बनावट ट्रस्ट, देणग्यांचा कोट्यवधीचा घोटाळा ATS कडून उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:12 IST2026-01-09T18:11:51+5:302026-01-09T18:12:23+5:30
लातूरच्या अॅक्सीस बँक शाखेत ५ खात्यावर पावणेपाच कोटी जमा; छत्रपती संभाजीनगर एटीएसने बीड जिल्ह्यातून दोन जणांना उचलले

Beed: गुलजार-ए-रजा नावाने बनावट ट्रस्ट, देणग्यांचा कोट्यवधीचा घोटाळा ATS कडून उघड
माजलगाव (जि. बीड): धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या उकळणे, आयकर विभाग, शासनाची फसवणूक करणे, एकाच बँकेत पाच खात्यावर ४ कोटी ७३ लाखांची रक्कम आढळून आल्याप्रकरणी पात्रुड येथील गुलजार-ए-रजा या बोगस ट्रस्ट विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एटीएसने मुजम्मिल नूर सय्यद याला पात्रुड येथून तर अहमद्दउद्दीन कैसर काझी याला केज येथून पकडले आहे. अन्य दोघे फरार आहेत.
छत्रपती संभाजीनगर एटीएसकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील विविध ट्रस्ट व एनजीओंची माहिती संकलित केली जात असतांना गुगलवर केलेल्या पडताळणीत त्यांना गुलजार-ए-रजा हे ट्रस्ट आढळून आले. सदरील ट्रस्टच्या स्वतंत्र संकेतस्थळावर माजलगाव तालुक्यातील येथील सत्तार गल्ली पात्रुड, भाटवडगाव असा पत्ता आढळून आला. हे धार्मिक ट्रस्ट वेगवेगळ्या कार्यात सहभागी आढळले. वेबसाईटवर अॅक्सीस बँकेचे खाते क्रमांक देऊन लोकांकडून देणग्या उकळल्या जात होत्या. एटीएसने लातूरच्या अॅक्सीस बँक, मार्केट यार्ड शाखेत केलेल्या चौकशीत गुलजार-ए-रजा ट्रस्टच्या नावाने एकाच ग्राहक ओळख क्रमांकावर पाच बँक खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमधून लोकांकडून प्राप्त होणाऱ्या देणगी थेट जमा होत असल्याची खातरजमा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली असता रक्कम ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे स्टेटमेंटवरून समोर आले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे काढले पॅनकार्ड
बँकेतील केवायसीची पडताळणी केली असता ट्रस्टच्या नोंदणी क्रमांकात तफावत आढळली. ट्रस्टने वापरलेला नोंदणी क्रमांक हा प्रत्यक्षात अन्य संस्थेचा असल्याचे स्पष्ट झाले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे चौकशी केली असता गुलजार-ए-रजा ट्रस्ट महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. ट्रस्टने दर्पण पोर्टल, आयकर विभाग व बँकेत वेगवेगळे आणि बनावट नोंदणी क्रमांक वापरून कागदपत्रे सादर केल्याचे तपासात उघड झाले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅनकार्ड काढून आयकर विभागाची फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. कर चुकवे गिरीच्या उद्देशाने खोटे बँक विवरणपत्र आयकर विभागाकडे सादर करण्यात आले.
एकाच बँकेत पाच खात्यावर रक्कम
गुलजार-ए-रजा बनावट ट्रस्टच्या नावाने लातूर येथील अॅक्सीस बँकेच्या मार्केट यार्ड शाखेमध्ये पाच खात्यांत एकूण ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण निधी धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून गोळा करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
ट्रस्टचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्तावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस जमादार मोहम्मद माेहसीन मोहम्मद जमीर शेख यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुलजार-ए-रजा ट्रस्टचा अध्यक्ष इम्रान शेख कलीम शेख रा. सदर बाजार अंबाजोगाई , उपाध्यक्ष सय्यद मुजम्मिल सय्यद नूर, रा. सत्तारगल्ली पात्रुड ता. माजलगाव, सचिव अहमदुद्दीन कैसर काझी रा.रोजा मोहल्ला केज व विश्वस्त तौफिक जावेद काझी रा.मुसा मलबारी चाळ अंधेरी पश्चीम, मुंबई यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (डीएनएस) २०२३ चे कलम ३१८(४), ३३५, ३३६(२), ३४० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.