Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:05 IST2025-12-23T16:04:14+5:302025-12-23T16:05:01+5:30
Walmik Karad Beed Sarpanch Death Case:आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होईल.

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
बीड: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड येथील मकोका न्यायालयात हायव्होल्टेज सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने वाल्मीक कराडसह सर्व आरोपींवर अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत. यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पहिल्यांदाच मौन सोडून न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने पुढील कारवाई सुरू ठेवली.
कोर्टात नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांनी १८०० पानांच्या दोषारोपपत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला. "तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का?" असा थेट प्रश्न जेव्हा विचारला गेला, तेव्हा वाल्मिक कराडसह सर्व सहा आरोपींनी "मान्य नाहीत" असे उत्तर दिले. यावेळी कराड स्वतःहून म्हणाला, "मला काही बोलायचे आहे." मात्र, कायद्याच्या प्रक्रियेनुसार आता प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुराव्यांचे काम सुरू होणार आहे.
खंडणीचा अडथळा आणि क्रूर हत्येचा व्हिडिओ
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, 'आबाडा' कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीच्या व्यवहारात संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते. याच रागातून आरोपींनी त्यांना टाकळी शिवारात नेऊन अमानुष मारहाण केली. आरोपींनी केवळ हत्या केली नाही, तर त्याचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो काढून त्या क्रूरतेचा आनंद साजरा केला. हे व्हिडिओ आता आरोपींच्या वकिलांना देण्यात आले असून, हेच व्हिडिओ या खटल्यातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहेत.
पुढील सुनावणी ८ जानेवारीस
आजच्या सुनावणीनंतर उज्वल निकम यांनी आरोपींच्या वकिलांवर 'D for Delay and D for Derail' (खटला लांबवणे आणि दिशाभूल करणे) असा गंभीर आरोप केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होईल.