Beed: प्लॉटसाठी वाद, रात्री नशेत सख्ख्या भावाचा खून; सकाळी म्हणतो, मी काहीच केले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:56 IST2025-12-01T14:55:23+5:302025-12-01T14:56:16+5:30
बीडमधील प्रकार : वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉटसाठी वाद

Beed: प्लॉटसाठी वाद, रात्री नशेत सख्ख्या भावाचा खून; सकाळी म्हणतो, मी काहीच केले नाही
बीड : वडिलांच्या नावे असलेला प्लॉट मला दे, असे म्हणत मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात काठी मारली. हा प्रकार शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बीड शहरातील इमामपूर रोडला घडला. सकाळी उठल्यावर जखमीला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या भावाला विचारल्यावर आपण काही केलेच नाही, असा आव त्याने आणला. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलिस ठाण्यात नोंद नव्हती, परंतु मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सचिन शहाजी फरताडे (वय ३५) असे मयताचे नाव आहे. तर शशिकांत फरताडे (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे. शहाजी फरताडे यांना चार मुले आहेत. ते आचारी असून बीड शहरातील इमामपूर रोडला वास्तव्यास आहेत. शशिकांत हा दुसरा, तर सचिन सर्वात लहान मुलगा होता. तो अविवाहित होता. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शशिकांत हा गांजा व दारूची नशा करून घरी आला. कोणालाही काही न बोलता त्याने आई दत्ताबाई यांचा गळा धरत हातावर काठी मारली. मोठा भाऊ अशोक सोडविण्यासाठी गेल्यावर त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. वडील शहाजी मदतीला धावले, तर त्यांच्याही मनगटावर काठीने मारहाण केली. एवढ्यात सचिन तेथे आला. शशिकांतने नशेत त्याच्यावरही हल्ला चढवला. एक काठी त्याच्या डोक्यात बसली. यात तो जखमी झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पेठबीड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सचिन जखमी होऊन रात्रभर घरीच
सचिनच्या डोक्यात काठी लागल्यानंतर थोडे रक्त निघाले. तो खाली पडल्यानंतर पाणी दिले. त्याला बरे वाटले. रुग्णालयात चल म्हणल्यावर मला काहीच झाले नाही, असे म्हणत तो घरीच थांबला. सकाळीही तो रुग्णालयात आला नाही. सकाळी ११ वाजता त्याला अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर तो घरीच झोपला. नंतर उठवायला गेले, तर त्याची हालचाल बंद झाली, असे सचिनचे वडील शहाजी फरताडे यांनी सांगितले.
सचिन मजूर, तर शशिकांत मिस्त्री
सचिन हा सर्वात लहान आहे. तो बांधकामाच्या कामावर मजुरी करायचा, तर शशिकांत हा बांधकाम मिस्त्री आहे. शशिकांतला दारू, गांजाची नशा करण्याची सवयच असल्याचे त्याचे वडील शहाजी फरताडे यांनी सांगितले.
तक्रारीप्रमाणे गुन्हा
दोघा भावांत वाद झाला होता, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. पथक घटनास्थळी गेले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला आहे. नातेवाइकांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल.
- मारोती खेडकर, पोलिस निरीक्षक, पेठबीड