बीडकरांनो, चादर, फुगे, खेळणी विकणाऱ्यांपासून सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:56 IST2018-04-03T23:56:01+5:302018-04-03T23:56:01+5:30
परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला पोलिसाच्या घरी चोरी करणा-या दोन आरोपींकडून याबाबत खुलासा झाला असून नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

बीडकरांनो, चादर, फुगे, खेळणी विकणाऱ्यांपासून सावधान!
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला पोलिसाच्या घरी चोरी करणा-या दोन आरोपींकडून याबाबत खुलासा झाला असून नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड शहरातील बालेपीर भागातील पोलीस कॉलनीतील कुसूम घुले यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. चादर विक्रीच्या बहाण्याने मोहम्मद सोनू व मोहम्मद जाबाज (रा.रसुलपुर जि.सारंगपुर, उत्तरप्रदेश) हे दोघे घरात शिरले होते. परंतु हा प्रकार घुले यांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला हिसका दाखविला. दोघे असल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि नागरिकांना जमा केले. त्यांच्या मदतीने या दोघांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता या दोघांनी अनेकांच्या घरी छोट्या मोठ्या चोºया केल्याची कबुली दिली आहे. तसेच यांच्यासारखेच काही लोक बीडमध्ये आले असावेत, असा संशय बीड पोलिसांना आहे. असे कोणी लोक खरच आले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, पोउपनि भुषण सोनार यांनी या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली.
सर्व सारखे नाहीत, पण काळजी घ्या...
परिस्थितीमुळे काही लोक खरोखरच मेहनत घेऊन पोटाची खळगी भरत आहेत. परंतु काही लोक चादर, फुगे, खेळणी विक्रीच्या बहाण्याने घरे हेरत आहेत. रात्रीच्यावेळी त्याच घरात चोरी करतात.
अनेकवेळा दिवसाही चोरी करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कसेही असो, परंतु नागरिकांनी सजग राहून काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी केले आहे.
परळीतही घडली होती घटना
दोन महिन्यांपूर्वी परळी शहरातही परराज्यातील आलेल्या काही लोकांनी दिवसभर फुगे विकून घरे हेरली होती. त्यानंतर रात्रीच्यावेळी त्यांनी घरफोड्या केल्या होत्या. या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलीस तपासातून अनेक बाबी समोर आल्या होत्या.