धारूर-तेलगाव रस्त्यावर पुन्हा एक बळी; भरधाव कारने मजूर तरुणास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:18 IST2021-03-13T12:17:16+5:302021-03-13T12:18:22+5:30
या महामार्गावर शुक्रवारी दिवसभरात अपघातात दोघांचे बळी गेले आहेत.

धारूर-तेलगाव रस्त्यावर पुन्हा एक बळी; भरधाव कारने मजूर तरुणास चिरडले
धारूर : धारुर-तेलगाव रस्त्यावर अपघात मालिका सुरूच असून शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान एका भरधाव कारने पादचारी तरुणास चिरडल्याची घटना एसआर पेट्रोल पंपासमोर घडली. सुरेश माणिक माळेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या महामार्गावर शुक्रवारी दिवसभरात अपघातात दोघांचे बळी गेले आहेत.
सुरेश माणिक माळेकर ( 29, गोपाळपूर ) तरुण एका हॉटेलवर मजुरीचे काम करतो. शुक्रवारी रात्री काम संपवून तो पायी घरी जात होता. यावेळी धारूरकडून तेलगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने ( एम एच 23 ए डी 0143 ) एसआर पेट्रोल पंपासमोर त्याला जोरदार धडक दिली. यात सुरेश जागीच ठार झाला. याप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधीत कार चालकाविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळाची पाहणी केली.