अंबाजोगाईत शिवशाहीची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:02 IST2019-01-23T20:02:31+5:302019-01-23T20:02:45+5:30
राजेभाऊ विठ्ठल बनकर (वय ५४, रा. वाघाळा) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे.

अंबाजोगाईत शिवशाहीची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
अंबाजोगाई (बीड ) : लातूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या शिवशाही बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री अंबाजोगाई जवळच्या वाघाळा पाटी येथे झाला.
राजेभाऊ विठ्ठल बनकर (वय ५४, रा. वाघाळा) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. राजेभाऊ आणि सुधाकर मारोती जोगदंड हे दोघे मंगळवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरून (एमएच ४४ - ८९९५) अंबासाखर कारखान्याकडून गावाकडे निघाले होते. ते वाघाळा पाटी जवळ आले असता लातूर - औरंगाबाद या शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू ०९०८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेही जबर जखमी झाले. त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून राजेभाऊ बनकर यांना मयत घोषित केले तर सुधाकर जोगदंड यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वैभव राजेभाऊ बनकर यांच्या फिर्यादीवरून शिवशाही बस चालकावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.