काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:14 IST2025-10-07T15:12:44+5:302025-10-07T15:14:04+5:30
सरकारकडून सध्या देशभरात चार्जिंग स्टेशन, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि EV इकोसिस्टम जलद गतीने उभी केली जात आहेत.

काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
Electric Vehicle: भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) बाजार झपाट्याने वाढत असून, या क्षेत्रात एक ऐतिहासिक बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (९ सप्टेंबर २०२५) जाहीर केले की, “पुढील ४ ते ६ महिन्यांत इलेक्ट्रिक कारच्या किंमती पेट्रोल कारइतक्याच होतील.” हा मोठा दावा त्यांनी FICCI हायर एज्युकेशन समिट २०२५ दरम्यान केला. त्यांच्या मते, भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र येत्या काही महिन्यांत मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे केवळ इंधन आयात खर्च कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळेल.
इलेक्ट्रिक कार पेट्रोलइतक्या स्वस्त होणार
गडकरी पुढे म्हणाले, “सरकार सातत्याने बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि देशांतर्गत उत्पादनावर भर देत आहे. त्यामुळे EV उत्पादनाचा खर्च कमी होत असून, लवकरच इलेक्ट्रिक कार पेट्रोल कारच्या किंमतींच्या पातळीवर पोहोचतील.”
सध्या भारत दरवर्षी सुमारे ₹२२ लाख कोटींचे इंधन आयात करतो, जे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार आहे. जर इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर वापरात आली, तर हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि भारताची आर्थिक आत्मनिर्भरता बळकट होईल.
स्वच्छ उर्जेकडे भारताचा प्रवास
गडकरी यांनी स्पष्ट केले की, "EV उद्योगाचा विस्तार केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर रोजगारनिर्मितीसाठीही महत्त्वाचा टप्पा ठरेल. बॅटरी रीसायकलिंग आणि स्थानिक उत्पादनातील गुंतवणूक भारताला जगातील इलेक्ट्रिक वाहनांचे केंद्र (EV Hub) बनवेल. मी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारताचा ऑटोमोबाईल उद्योग ₹१४ लाख कोटींचा होता. आज तो ₹२२ लाख कोटींवर पोहोचला आहे," असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या अमेरिका: ₹७८ लाख कोटी, चीन: ₹४७ लाख कोटी आणि भारत: ₹२२ लाख कोटी (तिसऱ्या क्रमांकावर) आहे. या वाढत्या गतीने भारत आता EV आणि ऑटो टेक्नॉलॉजीचा जागतिक नेता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारत सरकारकडून सध्या देशभरात चार्जिंग स्टेशन, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि EV इकोसिस्टम जलद गतीने उभी केली जात आहे.