मध्यमवर्गीयांची आवडती ७-सीटर आता महागली! अधिकचे २६००० मोजावे लागणार; पाहा नवी लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:49 IST2026-01-22T13:48:18+5:302026-01-22T13:49:12+5:30
टोयोटा मोटरने आपल्या या अत्यंत लोकप्रिय एमपीव्हीच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

मध्यमवर्गीयांची आवडती ७-सीटर आता महागली! अधिकचे २६००० मोजावे लागणार; पाहा नवी लिस्ट
भारतीयांची आवडती आणि मोठ्या कुटुंबांची पहिली पसंती असलेली टोयोटा इनोवा क्रिस्टा आता खरेदी करणे महाग झाले आहे. टोयोटा मोटरने आपल्या या अत्यंत लोकप्रिय एमपीव्हीच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. व्हेरियंटनुसार या कारच्या किमती १९,००० रुपयांपासून ते २६,००० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
आता किती मोजावे लागणार पैसे?
किमतीत झालेल्या या वाढीनंतर, टोयोटा इनोवा क्रिस्टाची एक्स-शोरूम किंमत आता १८.८५ लाख रुपयांपासून सुरू होऊन २५.५३ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने कारच्या इंजिनमध्ये किंवा फीचर्समध्ये कोणताही तांत्रिक बदल केलेला नाही. मात्र, उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
व्हेरियंटनुसार दरवाढीचा असा आहे तक्ता
भारतीय बाजारपेठेत इनोवा क्रिस्टा GX, GX+, VX आणि ZX अशा चार ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे.
बेस मॉडेल (GX): ७ आणि ८-सीटर व्हेरियंटच्या किमतीत १९,००० रुपयांची वाढ झाली असून नवीन किंमत १८.६६ लाख रुपयांपासून सुरू होते.
मिड आणि टॉप व्हेरियंट (GX+, VX, ZX): या व्हेरियंटच्या किमतीत २०,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
टॉप मॉडेल (ZX): केवळ ७-सीटर लेआउटमध्ये येणारे हे मॉडेल सर्वाधिक २६,००० रुपयांनी महागले आहे.
इंजिन आणि पॉवरमध्ये कोणताही बदल नाही
इनोवा क्रिस्टामध्ये पूर्वीप्रमाणेच २.४-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १५० hp पॉवर आणि ३४३ Nm टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असून ही कार रिअर-व्हील ड्राइव्ह सेटअपवर आधारित आहे.
दमदार फीचर्स आणि सुरक्षा
किंमत वाढली असली तरी फीचर्सची रेलचेल कायम आहे. यात ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पावर्ड ड्रायव्हर सीट आणि कलर टीएफटी डिस्प्ले मिळतो. सुरक्षेच्या दृष्टीने यात ७ एअरबॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
२०२७ मध्ये निरोप घेणार?
टोयोटा इनोवा क्रिस्टा २०१६ पासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, आगामी CAFE-3 उत्सर्जन नियमांमुळे कंपनी २०२७ मध्ये हे मॉडेल बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बाजारात या कारची स्पर्धा मारुती सुझुकी इनव्हिक्टो, टोयोटा इनोवा हायक्रॉस आणि किया कारेन्स यांच्याशी आहे.