काय हे...! कार नाही १० लाखांची, अन् नंबरसाठी मोजले २,०८,००,००० रुपये...; त्यापेक्षा गाडीच महागडी घ्यायची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:40 IST2026-02-02T16:39:47+5:302026-02-02T16:40:59+5:30
Most Expensive Number Plate India DDC 0001: फक्त एका नंबर प्लेटची किंमत २ कोटी! 😱 आंध्र प्रदेशच्या तरुणाने 'DDC 0001' नंबरसाठी लावली रेकॉर्डब्रेक बोली. या किमतीत २-३ लक्झरी गाड्या आल्या असत्या... पाहा फोटो!

काय हे...! कार नाही १० लाखांची, अन् नंबरसाठी मोजले २,०८,००,००० रुपये...; त्यापेक्षा गाडीच महागडी घ्यायची...
तुम्हाला आलिशान गाड्यांची आवड असेल, पण एका नंबर प्लेटसाठी कोणी किती खर्च करू शकतं? आंध्र प्रदेशातील एका तरुणाने चक्क २ कोटी ८ लाख रुपये खर्च करून 'DDC 0001' ही नंबर प्लेट विकत घेतली आहे. ही आतापर्यंतची भारतातील सर्वात महागडी कार नंबर प्लेट ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अशाच लिलावात एकाने करोडो रुपयांची बोली लावली होती, परंतू जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा ऐपत नसल्याचे सांगितले होते.
आताचा हा नवा लिलाव 'बिग बॉय टॉईज' या प्रसिद्ध ऑक्शन हाऊसने आयोजित केला होता. आता एखाद्याने रोल्स रॉयस, बेंटली सारख्या गाडीला एवढी महागडी नंबर प्लेट लावली असती तर ठीक होते. परंतू, या महाभागाने मारुती सुझुकीच्या इग्निसला ही नंबर प्लेट लावली आहे. या कारची किंमत नाही १० लाखांची आणि तिच्या नंबर प्लेटसाठी मोजले २.०८ कोटी अशी ही अवस्था झाली आहे.
लिलावाचा थरार: मूळ किमतीपेक्षा अनेक पटींनी बोली
या विशेष नंबर प्लेटचा लिलाव नुकताच पार पडला. सुरुवातीला या नंबरसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक बड्या उद्योगपतींनी यात रस दाखवला होता, मात्र आंध्र प्रदेशातील या तरुणाने सर्वांना मागे टाकत २.०८ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. भारतात यापूर्वीही '०००१' या नंबरसाठी लाखो रुपये मोजल्याची उदाहरणे आहेत, मात्र २ कोटींच्या वर जाणारी ही पहिलीच वेळ आहे.
'DDC 0001' मध्ये असं काय आहे खास?
व्हीआयपी नंबर: '०००१' हा नंबर नेहमीच स्टेटस सिम्बॉल मानला जातो. विशिष्ट सिरीजमधील पहिला नंबर मिळवण्यासाठी अनेकजण कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार असतात. शौकीन लोकांसाठी हे केवळ वेड नसून एक प्रकारची गुंतवणूक मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, या रकमेत भारतामध्ये किमान दोन ते तीन आलिशान मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू कार विकत घेता आल्या असत्या. मात्र, आपल्या गाडीला 'युनिक' बनवण्यासाठी या तरुणाने हे धाडस केले आहे, आता थोड्या दिवसांनी ऐपत नाही दाखविली म्हणजे मिळविले, अशाही कमेंट यावर येत आहेत.