When will the rangoli of the pits be filled? Avoid repairing the road from Cambridge Chowk to Chikalthana | खड्ड्यांची रांगोळी कधी बुजवणार ? केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्याच्या दुरुस्तीस टाळाटाळ

खड्ड्यांची रांगोळी कधी बुजवणार ? केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्याच्या दुरुस्तीस टाळाटाळ

ठळक मुद्देजून २०२० पासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.आठ महिन्यांपासून प्रवासी भोगत आहेत नरकयातना

- श्रीकांत पोफळे

करमाड : औरंगाबाद - जालना महामार्गावर केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा या २ किलोमीटरच्या परिसरात पावसाळ्यापासून खड्डे पडलेले असून अद्याप देखील त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. जून २०२० पासून हा चार किमीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून जूनपासून यावर कुठलेच दुरुस्तीचे काम झालेले नाही. मागील १० वर्षात पावसाळ्यानंतर फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही असं कधीही घडलेल नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून याची दुरुस्ती करावी अशी मागणी औरंगाबाद तालुक्यातील नागरिक व प्रवासी करत आहे.

राज्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतातचं गेल्या आठ महिन्यापासून खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावरील​ मोठमोठ्या खड्ड्यांमुळे केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा​हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा​मुख्यरस्ता व​ महामार्ग असूनही संबंधित विभागाचे​याकडे पूर्णपणे​दुर्लक्ष होत आहे. केम्ब्रिज चौक ते विमानतळापर्यंतचा रस्ता जून २०२० पासून जागतिक बँक प्रकल्पाकडून दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रस्तावर खड्डे पडलेले आहे. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यापासून या महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक वाहन चालकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे.​ 

काही दिवसांपूर्वीचं येथे खड्डा वाचवण्याच्या नादात मोटारसायकल चालकाने​अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागुन आलेल्या कारच्या धडकेत​ एक दुचाकीस्वार गंभीर जखमी​ झाला होता. दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा​मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग मागील आठ महिन्यापासून झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप शेंद्रा एमआयडीसीत जाणारे कामगार, रोज ये-जा करणारे शिक्षक, बँक, सरकारी अधिकारी- कर्मचारी, पालक- विद्यार्थी, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केला आहे. 

लवकरच दुरुस्ती करू 
या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे साईड अभियंता आशिष देवतकर यंच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की याची दुरुस्ती आम्ही लवकरच करणार आहोत. दुरुस्तीला विलंब का झाला असे विचारले असता त्यांनी सांगितले की टोलवसुली करणाऱ्यांनी दुरुस्ती करायला हवी होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने हस्तांतरीत झाल्यापासून म्हणजे जून २०२० पासून का केली नाही असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

'त्यांनीच' दुरुस्ती करावी
जालना रोड दुरुस्तीची जबाबदारी ही टोलवसुली करणाऱ्या ठेकेदाराची असते त्यांनी नाही बुजवल्यास आम्ही कारवाई देखील करू शकतो. मात्र, केम्ब्रिजपासून चिकलठाणा हा ४ किमीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. यामुळे त्यांनीच याची दुरुस्ती करावी.
- वैभव जाधव, कनिष्ट अभियंता, वर्ग-२, जागतिक बँक प्रकल्प.

Web Title: When will the rangoli of the pits be filled? Avoid repairing the road from Cambridge Chowk to Chikalthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.