Three arrested, including accused who did abortion of girlfriend | अत्याचारानंतर मैत्रिणीचा केला गर्भपात, आरोपीसह तीन जणांना अटक

अत्याचारानंतर मैत्रिणीचा केला गर्भपात, आरोपीसह तीन जणांना अटक

औरंगाबाद : ज्यूसमधून गुंगीचे औषध पाजून मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाने ती गर्भवती राहिल्याचे समजताच त्याच्या दोन मामांच्या मदतीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या.  हा मित्र अश्लील व्हिडिओ क्लीप आणि छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत ब्लॅकमेलिंग करीत असल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.

मोहंमद उमर जावेद, मोहंमद इस्माईल आणि नूर मोहंमद, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, पीडिता शहरातील एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेली असता आरोपी उमरने तिला पाहिले. तिचा पाठलाग करीत तो तिच्या घरापर्यंत गेला. नंतर काही दिवस तो तिच्या मागावर होता. यादरम्यान पीडिता आणि त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. जुलै २०१९ मध्ये पीडिता घरी एकटीच असताना तो तेथे आला. त्याने सोबत आणलेल्या ज्यूसमधून पीडितेला गुंगीचे औषध पाजले. पीडितेला गुंगी येताच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर लैंगिक संबंधाची त्याने मोबाईलवर व्हिडिओ क्लीप बनविली, छायाचित्रे काढली.

हा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर सतत अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिली. त्याने ही बाब त्याचे मामा आरोपी मोहंमद इस्माईल आणि नूर मोहंमद यांना सांगितली. आॅक्टोबर महिन्यात आरोपी उमर आणि त्याचे दोन्ही आरोपी मामा यांच्यासह पीडितेचे घर गाठले.  इस्माईल आणि नूर यांनी तिचे दोन्ही हात पकडले, तर आरोपी उमरने तिच्या तोंडात बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या कोंबल्या. यानंतर पीडितेचा गर्भपात झाला. ही बाब कोणालाही सांगू नये, याकरिता आरोपी पीडितेला सतत धमकावत होते. मात्र आरोपीकडून पुन्हा ब्लॅकमेलिंग होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन पीडितेने २५ जानेवारी रोजी सातारा ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: Three arrested, including accused who did abortion of girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.