Shocking! The mother of 2 children married again by showing single status | धक्कादायक ! २ मुलांच्या आईने कुमारी असल्याची थाप मारून पैसे घेऊन केले लग्न

धक्कादायक ! २ मुलांच्या आईने कुमारी असल्याची थाप मारून पैसे घेऊन केले लग्न

ठळक मुद्देआरोपी महिलेला अटक

औरंगाबाद : दोन मुलांची आई असताना कुमारी असल्याची थाप मारून एजंट महिलेच्या माध्यमातून लाखो रुपये आणि दागिने घेऊन तरुणासोबत विवाह करणाऱ्या महिलेला क्रांतीचौक पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. निरीक्षक उत्तम मुळक म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील श्रीराम वीरभान पाटील हे लग्नासाठी वधूचा शोध घेत होते. एक एजंट महिला सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे त्यांना जाऊन भेटली.  तिने तिच्या ओळखीची गरीब तरुणी उपवर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी एजंट महिलेने कविताची ओळख सुनीता म्हणून श्रीरामसोबत करून दिली. तिने लग्नाची तयारी दर्शविली. मात्र, लग्नासाठी पैसे नसल्याचे सांगितले. श्रीरामने खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.  ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगावात विवाह झाला. तत्पूर्वीच श्रीरामकडून कविता, तिची साथीदार व अमोल देठे यांनी १ लाख रुपये घेतले होते. श्रीरामने तिच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे घातले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची प्रकृती ठीक नाही, तिला भेटायला म्हणून कविता श्रीरामला घेऊन औरंगाबाद आली.  लघुशंकेला जाऊन येते, असे सांगून कविताने तेथून धूम ठोकली. कविता न परतल्याने श्रीरामने क्रांतीचौक ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलीस  तपास करीत असताना श्रीरामची पत्नी हरवली नाही ,ती स्वत:हून पळून गेल्याचे समजले. शिवाय ती दोन मुलांची आई आहे.  तिने खोटे नाव सांगून  पैशासाठी लग्न  केल्याचे समोर आले. श्रीराम यांनी १२ फेब्रुवारी रोजी फिर्याद नोंदविली. 

आरोपी कविताला अटक
पोहेकॉ. जैस्वाल यांनी कविताला पकडले. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. श्रीरामकडून घेतलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. कविताने अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून किती उपवरांना फसविले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Shocking! The mother of 2 children married again by showing single status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.