Rainwater Harvesting is trending to get a certificate of occupancy | भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे वाढतोय कल
भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे वाढतोय कल

ठळक मुद्देपाच वर्षांत ५ हजार ७२५ बांधकाम परवानग्याभोगवटा प्रमाणपत्र घेतले २ हजार ६५ जणांनीच

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीचे शहर झपाट्याने वाढू लागले आहे. शेतीच्या जागेवर सर्रासपणे सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच शिल्लक ठेवली जात नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची मागील काही वर्षांपासून  सक्ती करण्यात आली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकाला भोगवटा प्रमाणपत्र हवे असते तोच हार्वेस्टिंगची यंत्रणा उभी करतो; अन्यथा ७५ टक्के नागरिक याकडे दुर्लक्ष करतात.

मागील पाच वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेने तब्बल ५ हजार ७२५ बांधकाम परवानग्या दिल्या. बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक सहसा मनपाकडे वळूनही बघत नाही. कारण अगोदरच त्याचा एवढा छळ झालेला असतो की, तो परत भोगवटा प्रमाणपत्र घेण्यास येत नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत २ हजारांहून अधिक नागरिक, व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले. प्रत्येकाला रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली. मनपाचे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्यांकडून याची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात येते. त्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. कागदावर हार्वेस्टिंग उभारण्याचा प्रकार नाही. अनेक नागरिकांनी स्वत:च्या इच्छेने आपल्या विंधन विहिरींसाठी ही यंत्रणा उभारली आहे. 

पाच वर्षांतील बांधकाम परवाने आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग
2014-15
१,१८५ बांधकाम परवाने दिले, त्यातील ३४० जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले.
2015-16
१,०५० परवाने दिले. ३७० जणांनी हार्वेस्टिंगसह
 भोगवटा घेतले.
2016-17
१,२६० बांधकाम परवाने. ३९० जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले.
2017-18
१,१९० बांधकाम परवानगी तर ४८० जणांनी हार्वेस्टिंगनंतर प्रमाणपत्र दिले.
2018-19
१,०४० परवानगी घेतली. ४८५ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले. 


असे केले जाते जल पुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून जमिनीखालच्या एका मोठ्या टाकीमध्ये गोळा करतात, तर काही ठिकाणी साठवायचे पाणी खोल खड्डा करून जमिनीत सोडण्यात येते. ज्याठिकाणी पाणी मुरते तेथे जवळपास विंधन विहीर असल्यास उन्हाळ्यातही पाणी कमी होत नाही. आपण साठवलेले पाणी निसर्ग आपल्याला परत देतो. जमिनीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे विशेष.

जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदे
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.
जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाणी जमा करण्याची पद्धती खूपच सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगवर केला जाणारा खर्च, हा खर्च नसून ती भविष्यकाळाची गुंतवणूकच आहे. स्वत:साठी हे करावे. निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. आज पर्यावरणाची परिस्थिती पाहता, भूगर्भातील पाणी संपायलाही फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा पावसाचे पाणी हे निसर्गाने दिलेले दान समजून त्याचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.

सक्तीमुळे जनजागृती होत आहे
 मागील काही वर्षांपासून हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात येत असल्याने जनजागृती होत आहे. ज्या नागरिकांनी हार्वेस्टिंग केले त्यांना रिझल्टही दिसू लागला. जमिनित पाणी मुरविणे ही आता काळाची गरज बनली आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यावर नियंत्रण मिळविले तर बरेच कही साध्य होईल. खुल्या जागांवर पेव्हर ब्लॉक, सिमेंटीकरण करायला नको. पाणी मुरण्यासाठी जागाच ठेवली नाही. - ए.बी. देशमुख, उपअभियंता, मनपा

महापालिकेने स्वत:ही केले
रेन वॉटर हार्वेस्टिंगविषयी जनजागृती व्हावी यासाठी मनपाने स् वत:च्या इमारतीवर सर्वात अगोदर हा प्रयोग केलेला आहे. बांधकामाचा भोगवटा देताना हार्वेस्टिंग पाहूनच प्रमाणपत्र दिले जाते. शहरात २० ते २२ हजार ठिकाणी हार्वेस्टिंग आहे. नागरिकांमध्ये आणखी व्यापक जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येतील. कारण ही काळाची गरज आहे. - नंदकुमार घोडेले, महापौर 

Web Title: Rainwater Harvesting is trending to get a certificate of occupancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.