गोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:33 AM2020-01-23T11:33:45+5:302020-01-23T11:36:49+5:30

स्थानिक पातळीवर बैठका, वातावरणनिर्मिती मात्र नाही

Pankaja would fast where Gopinath Munde was sitting in 2013 | गोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण

गोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ जानेवारीला पंकजा मुंडे यांचे धरणे  औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील ठिकाण 

औरंगाबाद : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे २०१३ साली औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ज्या जागेवर उपोषणास बसले होते त्याच जागी २७ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला असल्याची माहिती पंकजांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.

दुसरीकडे उपोषणाला चार दिवसांचा अवधी बाकी असताना  पंकजांच्या या उपोषणासंबंधी औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यात काहीच वातावरणनिर्मिती नाही. यामुळे हे उपोषण होते किंवा नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उपोषणासंबंधी मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनाही अद्याप कोणत्याही सूचना नसल्याचे कळते. असे असले तरी उपोषण होईल, असे कार्यकर्ते सांगत आहेत. 

भारतीय जनता पक्षातील राज्यस्तरीय नेत्यांवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी परळीजवळील गोपीनाथ गडावरून यासंबंधी घोषणा केली होती. या घोषणेनुसार पंकजा मुंडे यांचे २७ रोजी लाक्षणिक उपोषण होणार आहे. परळी येथे स्वपक्षातील नेत्यांसंबंधी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, २७ रोजीचे उपोषण हे विद्यमान महाआघाडी सरकारविरोधात असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर हे उपोषण होणार आहे. ९ आणि १० एप्रिल २०१३ या काळात खासदार असलेले गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात दुष्काळ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन दिवस उपोषण केले होते. मुंडे यांनी  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील ज्याठिकाणी उपोषण केले होते तीच जागा पंकजा यांनीही निवडल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली.

गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाच्या काळात स्वत: पंकजाही त्यांच्याजवळ होत्या.  पित्याची काळजी घेताना त्यांना सर्वच कार्यकर्ते आणि नेत्यांनी पाहिले आहे. राज्याचे तत्कालीन मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मुंडे यांचे उपोेषण सोडविले होते. मुंडे यांच्या उपोषणाच्या काळात पंकजा या राजकारणाचे धडे घेत होत्या. पंकजांच्या या उपोषणाची तयारी मात्र अद्याप दिसत नाही. शहरात यासंबंधी कुठेही बैठक झालेली नाही किंवा त्याची चर्चा होतानाही दिसत नाही. यामुळे उपोषणाबाबत अनिश्चितता असल्याचे वातावरण आहे. 

राज्याचा दौराही निश्चित नाही
परळीजवळील गोपीनाथ गडावरून पंकजांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध असंतोष व्यक्त करतानाच मुंबईत २६ जानेवारी रोजी गोपीनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करण्याचे आणि २७ रोजी औरंगाबादेत उपोषण करण्याचे ठरविले होते. मात्र, मुंबईचे कार्यालय ५ फेब्रुवारीला सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र, औरंगाबादचे उपोषण २७ रोजीच होणार असल्याची माहिती भाजपमधील पंकजा यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. २७ जानेवारीनंतर त्यांनी राज्यभर दौरा करण्याचेही परळी येथे जाहीर केले होते. मात्र, पंकजांच्या राज्यभराच्या दौऱ्यासंबंधी अद्याप निश्चित माहिती मिळत नाही. 

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
पंकजांचे उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली असणार आहेत. यामुळे औरंगाबादमधील पक्षाच्या बऱ्याच वरिष्ठ कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधी उपोषण असले तरी उपोषणाचा रोख हा आधी जाहीर केल्याप्रमाणे पक्षाच्याच राज्यातील नेत्यांविरुद्ध असल्याने उपोषणात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी संभ्रमात आहेत. पक्षाच्या बॅनरखाली उपोषण झाले असते, तर अधिकाधिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले असते, अशी प्रतिक्रिया एका पदाधिकाऱ्याने दिली. 

Web Title: Pankaja would fast where Gopinath Munde was sitting in 2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.