Maharashtra Assembly Election 2019 : Three ministers defeat in Marathwada; Pankaja Munde, Khotkar, Jaydatta Kshirsagar lost | मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत
मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत

- गजानन दिवाण 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत ग्रामविकास आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे (परळी), रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर  (बीड) आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर (जालना) या तीन मंत्र्यांचा पराभव धक्कादायक ठरला. 

४६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी विजय मिळवीत भाजप नंबर वन राहिला. शिवसेना १२, काँग्रेस आठ, राष्ट्रवादी आठ आणि शेकाप, रासपने प्रत्येकी एक जागा मिळविली.  राज्याचे लक्ष लागलेल्या परळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावातील लढत लक्षवेधी ठरली. निवडणुकीच्या दोन दिवस आधी व्हायरल झालेल्या धनंजय यांच्या कथित व्हिडिओने खळबळ उडवून दिली. आरोप-प्रत्यारोप झाले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेते परळी आपलीच असल्याचा दावा करीत असताना मतदारांनी त्यांचा अंदाज खोटा ठरविला.

राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून सेनेत प्रवेश घेत मंत्रीपद मिळविणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना बीडमध्ये त्यांचा  पुतण्या संदीप क्षीरसागर भारी पडला. तिकडे जालना मतदारसंघात गेल्यावेळी निसटता पराभव पत्कारावा लागलेले काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुत खोतकर यांचा पराभव केला. सलग चार वेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला घनसावंगी मतदारसंघ राजेश टोपे यांनी शेवटपर्यंत झुंज देत कायम राखला. त्यांनी सेनेचे हिकमत उढाण यांचा पराभव केला. या जिल्ह्यात सेनेला एकही जागा मिळाली नाही. 

नांदेडमध्ये भाजपच्या बंडखोरीबरोबरच अंतर्गत संघर्षही शिवसेनेला भोवला. त्यामुळे जिल्ह्यातील नऊपैकी अवघ्या एका जागेवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. काँग्रेसचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. विरोधकांनी लक्ष केंद्रित केलेल्या भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला धोबीपछाड देत ९७ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. माजी मंत्री डी. पी. सावंत यांना नांदेड उत्तरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी झाले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याच्या मुद्यावर रण तापवत महायुतीने चारही जागा खेचून आणल्या. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरातून विजय मिळविला.  हिंगोलीत भाजप, सेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. परभणीत भाजप, सेना, काँग्रेस आणि रासपने प्रत्येकी एक जागा मिळविली. गेल्यावेळी दोन आमदार असलेल्या राष्ट्रवादीला येथे यावेळी भोपळाही फोडता आला नाही. 

सख्खे भाऊ विधानसभेत : लातूर शहर आणि ग्रामीणमधून अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोन सख्खे भाऊ विजयी झाले. धीरज देशमुख यांनी येथे विक्रमी मताधिक्य मिळविले. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्यातून विजय मिळविला. येथे पुन्हा एकदा काकावर पुतण्याने मात केली आहे.

जेलमधून लढले आणि जिंकले : शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला. गेल्या चार महिन्यांपासून ते परभणीच्या कारागृहात आहेत. 

यंदा काय बदल झाला?
- गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याने भाजपला १७ आमदार दिले. यावेळी यात एका अंकाची घसरण झाली. 
- गेल्या विधानसभेत शिवसेनेला १० आमदार देणाऱ्या मराठवाड्याने यावेळी आणखी दोन आमदारांची भर घातली. 
- मागच्या वेळी काँग्रेसचे नऊ आमदार होते. यावेळी ही संख्या एकने कमी झाली. औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबादेत पक्षाची स्थिती अतिशय वाईट राहिली.
- राष्ट्रवादीची संख्या आठवरून सातवर पोहोचली. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Three ministers defeat in Marathwada; Pankaja Munde, Khotkar, Jaydatta Kshirsagar lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.