Death of a young boy swimming in a lake in Aurangabad | पाझर तलावात पोहण्यास गेलेल्या युवकाचा मृत्यू 

पाझर तलावात पोहण्यास गेलेल्या युवकाचा मृत्यू 

ठळक मुद्देमित्रांसोबत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला असताना घटना

वरुडकाजी( औरंगाबाद) : येथे पाझर तलावात पडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता घडली. आकाश राजू लोखंडे (१९) असे मृत युवकाचे नाव आहे.

वरुडकाजी गावालगत समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गालगत असलेल्या डोंगरावर मारुतीचे मंदिर आहे. श्रावण महिन्यानिमित्त मारुती मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याला जेवणासाठी आकाश व त्याचे काही मित्र गेले होते. दुपारी जेवण करून आकाश व त्याचे मित्र पोहण्यासाठी पाझर तलावात उतरले.या तलावातील मुरूमचा उपसा केल्याने तलावातील खड्ड्याचा  अंदाज न आल्याने आकाश पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु त्याला पाण्याबाहेर काढण्यापूर्वी तो मरण पावला. 

माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या साह्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रवाना केला. आकाश याच्या पश्चात भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक फौजदार आबासाहेब देशमुख करीत आहेत. 

Web Title: Death of a young boy swimming in a lake in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.