BJP too ready for coming municipal elections | महापालिका निवडणुकीत भाजपचीही स्वबळाची तयारी

महापालिका निवडणुकीत भाजपचीही स्वबळाची तयारी

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांना साडेचार महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकींच्या राजकीय नियोजनावर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेना-भाजप महायुतीचे सूर जुळो अथवा न जुळो, पालिका निवडणुका युती करून न लढण्याची भूमिका भाजप पदाधिकारी, इच्छुकांनी घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर मनपा निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे लढतील, असे शिवसेनेने सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपने देखील स्वबळाच्या अनुषंगाने पूर्ण वॉर्डनिहाय सामाजिक आरक्षणांच्या हेतूसह उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. प्रभाग रचनेत सोयीनुसार वॉर्डांच्या सीमांची हद्द आखण्यासाठी शिवसेना आणि भाजपतील इच्छुक पालिका निवडणूक विभागावर लक्ष ठेवून आहेत. 

सत्ताधारी असोत किंवा विरोधक प्रभाग रचनेच्या कामांत फारशी लुडबुड करणे शक्य नसते, तरीही सेना, भाजपतील इच्छुकांनी सर्व मार्गांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी पक्षाची मुंबईत संघटन कार्यशाळा होणार आहे. त्या कार्यशाळेत राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याबाबत चिंतन होणार आहे. दरम्यान रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेत स्वबळावर लढल्यास काय स्थिती असेल, याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पूर्व मतदारसंघातही आ. अतुल सावे यांनीही प्रभाग रचनेप्रकरणी आढावा घेतल्याची चर्चा आहे. 

हिंदुत्व हा आता आमचा मुद्दा 
भाजप महापालिका स्वबळावर लढणार आहे. हिंदुत्व आणि विकास हा आमचा मुद्दा राहील. शिवसेनेचा हिंदुत्व हा मुद्दा आहे की नाही, हे माहिती नाही. हिंदुत्वाच्या मुद्यासह शहरातील विकासकामांची आमची भूमिका काल होती, आजही आहे आणि येणाऱ्या काळातही राहणार आहे. मागील पाच वर्षांत भाजपने शहरातील रस्ते कामांसाह पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर करून आणला. हे सर्व कुणी केले, हे जनतेला माहिती आहे. 
- डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ

आमचीही स्वबळाची तयारी 
शिवसेना काय करणार, हे माहिती नाही. सेना-भाजप युती मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सोबत आहे; परंतु आता शिवसेनेची मानसिकता बदलली असेल तर भाजपची स्वबळाची तयारी कालही होती, आजही आणि उद्यादेखील राहील. अजून मनपा निवडणुकीला वेळ आहे. साडेचार महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत राज्यात काहीही होऊ शकते. 
-शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजपा 

Web Title: BJP too ready for coming municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.