भाजपा माझ्या बापाचा पक्ष, हा अहंकार नसून प्रेम - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 05:21 PM2020-11-12T17:21:50+5:302020-11-12T17:35:25+5:30

राजकीय भूकंप झाल्याप्रमाणे एकामागून एक अनेकांचे फोन आले

BJP is my father's party, it is not ego but love - Pankaja Munde | भाजपा माझ्या बापाचा पक्ष, हा अहंकार नसून प्रेम - पंकजा मुंडे

भाजपा माझ्या बापाचा पक्ष, हा अहंकार नसून प्रेम - पंकजा मुंडे

googlenewsNext
ठळक मुद्देशिरीष तुझ्यासाठी एक जणाचे तिकिट कापून आले

औरंगाबाद : अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. हा अहंकार नसून प्रेम आहे. उंटावरून कुणीही शेळ्या हाकायच्या नाही. कुणाला निमंत्रण मिळाले, म्हणून नाराज व्हायचे नाही. काल रात्री आठ वाजता डॉ.कराड, नंतर आ.निलंगेकर मग बोराळकर यांचा फोन आला, औरंगाबादेत राजकीय भूकंप झाल्याप्रमाणे सगळ्यांचे एकामागून एक फोन आले. सगळ्यांचे एकच सांगणे एकच होते, आमचा फॉर्म भरण्याची वेळ ठरली आहे. विमानात तिकिट नव्हते, परंतु आज आले नसते तर मी नाराज असल्याची हेडलाईन झाली असती. भाजपा, मुंडे साहेबांनी जे संस्कार केले आहेत, त्यानुसारच पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करणे कर्तव्य असल्याचे सांगून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उमेदवारीवरून नाराजी आणि गटबाजीवर गुरूवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी गुरूवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या सेव्हन हिल्स येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खा.डॉ.भागवत कराड, खा.प्रीतम मुंडे, आ.हरिभाऊ बागडे, सचिव विजया रहाटकर, निवडणुकप्रमुख आ. संभाजी निलंगेकर, आ.अतुल सावे, आ.मेघना बोर्डीकर, आ.रमेश कराड, आ.तानाजी मुटकूळे, आ.राजेश पवार, आ.सुरेश धस, आ.अभिमन्यू पवार, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी मुंडे म्हणाल्या, मी आलेली आहे, खुप कष्टाने वेगैरे नाही, सातसमुद्र पार करून आलेले नाही. आज विमानात जागा नव्हती, पुर्ण बुक होते. मग बोराळकरसाठी  एकजणाचे तिकिट कापले आणि आले. यापेक्षा काय संदेश द्यायचा आहे. आता जास्तीचे सांगायची गरज नाही, बंडखोरी झाली आहे, ती फक्त चर्चा आहे. कुणाचे नाव घेतले नाही म्हणून आता माझ्यावर रागावू नका, जे काही रागवयाचे असेल ते उमेदवारावर रागवा. असे सुचक वक्तव्य करून त्यांनी मनातील सल बोलून दाखविली. दरम्यान भाजपाचे बंडखोर प्रवीण घुगे, रमेश पोफळे, माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांची कार्यक्रमाला उपस्थिती नव्हती. 

नाराजांची समजुत काढणार
पुर्वी गोपीनाथ मुंडे उमेदवार निश्चित करायचे आता त्यांच्या कन्येला वगळून उमेदवार दिले जात आहेत. तुम्ही नाराज आहेत काय ? मी नाराज नाही. ज्यांनी अर्ज भरला आहे ते माघार घेतील, त्यावर मुंडे म्हणाल्या, माझे समर्थक म्हणून नाहीतर ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. नाराज असण्याचे कारण नाही. बोराळकर यांना मागेही उमेदवारी दिली होती. गेल्यावेळी मुंडे यांच्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यांत उदासिनता होती. कोअर कमिटीच्या विविध नावांवर चर्चा झाली. सामाजिक संतुलनानुसार पाहून उमेदवारी दिली. माझे समर्थक जे आहेत, ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. बोराळकरांना विरोध, घुगेंना पाठींबा असे नाही. त्यांची समजुत घालील. पोफळे यांना भेटेल. त्यामध्ये मला यश येईल असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: BJP is my father's party, it is not ego but love - Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.