आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर; रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:18 IST2020-01-14T18:15:10+5:302020-01-14T18:18:27+5:30
रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु.

आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर; रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करणार!
औरंगाबाद: अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालिल वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी अपयशी ठरली असून आता आम्ही आमचा मार्ग चोखाळणार असल्याचे आनंदराज यांनी आज येथे जाहीर केले. रिपब्लिकन सेना नव्याने उभारणार असल्याचे ते म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.
मौलाना आझाद संशोधन केंद्रात रिपब्लिकन सेनेची दुपारी महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु. राजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण असले तरी युध्दात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची असे ठरवले आहे असे सांगून आनंदराज म्हणाले, सीएए आणि एनआरसीचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपकडे आता राम मंदिराचाही मुद्दा राहिला नाही.त्याचाही त्यांना फटका बसेल.
केंद्र सरकावर टिका करताना आनंदराज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार आज जे काही देशात आणू पाहत आहे,ते दुर्दैवी होय. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले,तेव्हा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत होता. मात्र हे स्वप्न आता पार धुळीस मिळाले आहे. जीडीपी रसातळला गेला आहे. सीएए आणि एनआरसीने देशाचा कोणताही विकास होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी नोंदवले.