जिल्हा परिषदेच्या सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:20+5:302021-02-05T05:31:20+5:30

चांदूर रेल्वेत पंचायत समितीची आढावा बैठक, अंगणवाडी सेविकेला ‘शो कोज’ चांदूर रेल्वे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल ...

Zilla Parishad CEOs take students 'class' | जिल्हा परिषदेच्या सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा ‘क्लास’

जिल्हा परिषदेच्या सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा ‘क्लास’

चांदूर रेल्वेत पंचायत समितीची आढावा बैठक, अंगणवाडी सेविकेला ‘शो कोज’

चांदूर रेल्वे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत बग्गी या गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केले. काही वेळ त्यांना शिकवलेदेखील. यानंतर लगतच्या बंद अंगणवाडीकडे मोर्चा वळविला. कामात कुचराईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत ‘शो कॉज’ बजावण्याचे निर्देश दिले.

अमोल येडगे हे पंचायत समितीच्या आढावा सभेनिमित्त आले होते. तालुक्यातील जल जीवन मिशन, प्रत्येक घरी नळ कनेक्शन योजना तसेच प्रधानमंत्री घरकुल महाआवास योजनेंतर्गत सर्व घरकुले २७ फेब्रुवारीपर्यंत मंजूर करणे, जागा नसलेल्या घरकुल लाभार्थींना जागा उपलब्ध करून देणे, रक्ताच्या नात्यातील लोकांची जागा असल्यास त्यांना बक्षीस पत्राद्वारे जागा नावे करून देणे, महाराष्ट्र ग्रामीण योजना सुरू असलेले तसेच पूर्णतः झालेल्या कामाचा आढावा त्यांनी आज घेतला. यांसह ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरील लेख आक्षेपांचा आढावा व शाळेच्या ई-क्लास जमिनीची सीमा निश्चिती, पाणीपुरवठा योजनेचे कामे त्वरित पूर्णत्वास नेणे, ग्रामपंचायत स्तरावरीव पंधराव्या वित्त आयोगाच्या नियोजन आढावादेखील यावेळी त्यांनी घेतला, यानंतर त्यांनी बग्गी गावाला भेट देऊन नव्याने कार्यन्वित पाणीपुरवठा योजनेचे अवलोकन केले, शिवाय तेथील शाळेला भेट दिली. बंद अंगणवाडीबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत कारवाईचे निर्देश दिले. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमप आदी उपस्थित होते

--------------

घरकुल महाआवास योजनेबाबत समाधान

घरकुल महाआवास योजनेंतर्गत गतवर्षी ७४१ लाभार्थींना जागेअभावी घरकुल देता आले नाही. त्यातील ४६१ लाभार्थींना विविध योजनेंतर्गत जागा उपलब्ध करून दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विस्तार अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमप यांचे कौतुक करीत समाधान मानले,

Web Title: Zilla Parishad CEOs take students 'class'