गुटखा गोदामांवर धाडी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:45+5:30

‘लोकमत’ने ३१ जानेवारी रोजी ‘पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही’ या आशयाचे वृत्त लोकदरबारात मांडले. युवक काँग्रेसने एफडीए कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर एफडीए प्रशासन खडबडून जागे झाले. काही दुकानांवर धाडी टाकून अवैध गुटखा जप्त करण्यात आला.

Why not attack on gutka warehouse? | गुटखा गोदामांवर धाडी का नाही?

गुटखा गोदामांवर धाडी का नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देएफडीएची कारवाई संशयास्पद : बडे मासे गळाला केव्हा लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ने दोन दिवसांपासून शहरात अवैध गुटखा विक्रेते व तस्करांविरूद्ध कारवाईचा सपाटा चालविला असला तरी ती थातूरमातूर आहे. एफडीएच्या चमूने मोठ्या प्रमाणात साठवून असलेल्या गुटखा गोदामांपर्यंत मजल गाठलेली नाही, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
‘लोकमत’ने ३१ जानेवारी रोजी ‘पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही’ या आशयाचे वृत्त लोकदरबारात मांडले. युवक काँग्रेसने एफडीए कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर एफडीए प्रशासन खडबडून जागे झाले. काही दुकानांवर धाडी टाकून अवैध गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, गुटखा गोदामांची ठिकाणे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली असतानाही एफडीएचे अधिकारी तेथपर्यंत पोहोचण्याची हिंमत करू शकले नाहीत, यात बरेच वास्तव दडले आहे. केवळ लहान-सहान गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून विशेष मोहीम राबवित असल्याचे चित्र रंगविले जात असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, शहरात अवैध गुटखा विक्री, तस्करी रोखण्यासाठी नागपूर व अमरावती विभागातील एफडीएचे अधिकारी ठाण मांडून आहेत. तरीदेखील आतापर्यंत गुटखा गोदामांवर धाडी का नाही, ही बाब संशयास्पद ठरणारी आहे. एफडीए कारवाईदरम्यान ‘बड्या माशां’पासून सुरक्षित अंतर राखणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी गुटखा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यादरम्यान शहरातील ३० गोदामांची तपासणी केली. यात काही किरकोळ विक्रेत्यांचा समावेश आहे.
- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, अमरावती

किरकोळ विक्रेत्यांना विचारा, तस्कर कोण?
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर करण्यात आली आहे. या गुटखा विक्रेत्यांकडे तो कोण आणून देतो, गुटखा तस्कर कोण, या खोलात जाण्याचे धाडस एफडीएचे अधिकारी का करीत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Why not attack on gutka warehouse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.