विदर्भात पावसासह गारपिटीचा तडाखा ! मेळघाट आणि गडचिरोलीत वादळासह पाऊस, पिके जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:21 IST2026-03-19T15:17:27+5:302026-03-19T15:21:21+5:30
Amravati : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १७ मार्चपासून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याचा प्रत्यय मेळघाटात पाहायला मिळत असून, बुधवारी सायंकाळी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमावर्ती भागासह बोदू आणि लाखेवाडा परिसरात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Vidarbha hit by hailstorm with rain! Rain with storm in Melghat and Gadchiroli, crops destroyed
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा / चांदूर रेल्वे (अमरावती) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १७ मार्चपासून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याचा प्रत्यय मेळघाटात पाहायला मिळत असून, बुधवारी सायंकाळी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमावर्ती भागासह बोदू आणि लाखेवाडा परिसरात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या निसर्गाच्या कोपामुळे आदिवासी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
तालुक्यातील दुर्गम आणि सीमावर्ती भागात बुधवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. बोदू, लाखेवाडा यांसारख्या गावांमध्ये पावसासोबतच गारपीट झाल्याने परिसरातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे तसेच चुरणी आणि परिसरातही बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली असून, येथे तुरळक पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली.
चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर यांनी सीमावर्ती भागात पाऊस आणि गारपिटीमुळे नेमकी परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट केले. मार्च महिन्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. महसूल विभाग आता या भागातील नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्याच्या तयारीत आहे.
गडचिरोलीत वादळासह पाऊस, पिके जमीनदोस्त
गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडवली. काढणीला आलेली पिके भिजल्याने आणि मका पीक जमीनदोस्त झाल्याने उत्पादनावर मोठे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात सध्या उडीद, मूग, हरभरा आणि गहू या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी मळणीसाठी पिके जमा करून ठेवली होती, मात्र अचानक आलेल्या पावसाने ही पिके पूर्णपणे भिजली. यामुळे धान्याचा दर्जा घसरून बाजारभावात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः आरमोरी, अहेरी आणि चामोर्शी तालुक्यात वादळाचा जोर अधिक होता. सूर्यडोंगरी, आकापूर आणि किटाळी परिसरातील उभ्या मका पिकाला निसर्गाने आडवे केले. कणसांत दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच हे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.