विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी

By Admin | Updated: September 10, 2016 00:20 IST2016-09-10T00:20:10+5:302016-09-10T00:20:10+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी....

The University offers training, job opportunities for students | विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी

विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी

कुलगुरुंचा पुढाकार : पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लाभ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पुढाकार घेतला. प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाच्यावतीने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसद्वारा कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम लकवरच सुरू होणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगाराचे दालन उपलब्ध होतील.
शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ व्हावे, या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यांत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता कुलगुरूंनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयाची निवड विद्यापीठाव्दारे होणार असून त्याठिकाणी २० दिवसांचा प्रशिक्षण वर्ग टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसद्वारा (टीसीएस) आयोजित केली जाणार आहे. १०० तासांचा असलेल्या प्रशिक्षण वर्गात दररोज ५ तास विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळण्याकरिता कुशलतेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६० विद्यार्थ्यांची प्रशिक्षण वगार्साठी निवड होणार असून २० दिवसांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर २१ व्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन टाटा कंपनीमध्ये रोजगारासाठी निवडले जाणार असल्याची माहिती प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाचे श्रीकांत पाटील यांनी दिली. प्रायोगिक तत्त्वावर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, अकोला आणि परतवाडा येथे टी.सी.एस. द्वारा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. लवकरच पाचही जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांत ‘इंफर्मेेटीव्ह अ‍ॅक्शन ट्रेनिंग प्रोग्राम’ सारखे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहे. त्यात इंग्रजी संवाद, स्मरणशक्ती, शब्दसमूह, कौशल्य विकास, मुलाखततंत्र, व्यक्ती परिचय, लेखन कौशल्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव राहील. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना नोकरीची अनंत संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टीसीएस प्रशिक्षण सारखे उचललेले पाऊल स्वागतार्थ असून शैक्षणिक क्षेत्रातून कुलगुरुंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: The University offers training, job opportunities for students