वनविभागाला हवी पोलिसांनी सोडलेली गाडी, लाकूड तस्करांना वनविभागाकडून नोटीस, आरटीओंकडून मागवली वाहनांची माहिती फोटो- खुंट कापलेला फोटो घेणे
अनिल कडू
परतवाडा : मध्य प्रदेशसह मेळघाटातून राज्यात व परराज्यात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी केली जात आहे. आंध्र प्रदेशातील हैदराबादपर्यंत या सागवान तस्करीची तार जोडली गेली आहे. तस्करीकरिता अवैधरीत्या तोडले गेलेले सागवान लाकूड, वाहन पोहोचू शकेल अशा सुरक्षित ठिकाणी गोळा केले जाते. लाकूड तस्करीकरिता वापरल्या गेलेली अशी चार वाहने, अवघ्या दोन महिन्यात, परतवाडा वनविभागाने लाखो रुपये किमतीच्या लाकडासह ताब्यात घेतली आहेत. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात वनपाल उमक व त्यांच्या अधिनस्थ वनरक्षकांसह वनकर्मचारी आपला जीव धोक्यात घालून ही लाकूड तस्करी रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
---------------
आरटीओकडून माहिती मागवली
ताब्यात घेण्यात आलेल्या एमएच ०१ एल २२५९, एमएच ०४ सीए ८१८७, एमएच २७ एक्स ७६१५ आणि एमएच ३२ डी ४९३० क्रमांकाच्या मालवाहू गाड्यांची माहिती वनविभागाने आरटीओकडून मागवली आहे.
-----------
पोलिसांनी सोडलेल्या वाहनाचा शोध
अवैध लाकूड तस्करीत वापरले गेलेले एक वाहन अचलपूर पोलिसांनी ऑगस्टमध्ये सोडले होते. हे प्रकरण पोलीस विभागात वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने घेतले गेले. यात एका पोलीस शिपायाला निलंबित केले गेले, तर ठाणेदारांची उचलबांगडी झाली. यादरम्यान प्रकरणातील मुख्य आरोपीची माहिती वनविभागाला मिळाली आहे. हा मुख्य आरोपी मिळाल्यानंतरच पोलिसांकडून सोडल्या गेलेल्या त्या वाहनाची माहिती मिळणार असल्याची शक्यता वनसूत्रांकडून वर्तविला जात आहे.
-----------------
लाकूडतस्करांना वनविभागाची नोटीस
लाकूड तस्करीच्या अनुषंगाने ब्राह्मणवाडा थडी येथील तीन आरोपींना वनविभागाकडून नोटीस बजावली गेली. या नोटीसद्वारे त्यांना परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात हजर होण्यास सुचविले, पण ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना वनविभागाने दुसरी नोटीस बजावली आहे.
मध्य प्रदेशात इनकेस पंचनामा
महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेश सीमेतील वनक्षेत्रातही वृक्षतोड अधिक आहे. यासोबतच लगतच्या मेळघाट वनक्षेत्रातही वृक्षतोड केली जात आहे. सागवान तस्करी च्या अनुषंगाने परतवाडा वनविभागाने मध्यप्रदेशातील त्या जंगलक्षेत्रात इनकेस पंचनामा केला आहे.