पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:31 IST2017-08-17T23:31:20+5:302017-08-17T23:31:54+5:30

एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे.

 Teachers came to the market to provide nutrition | पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

ठळक मुद्देमुख्याध्यापकांवरही जबाबदारी : माध्यान्ह भोजनाची साहित्य खरेदी करावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे. विद्यार्थ्याना माध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम मुख्याध्यापक, शिक्षकांना करावे लागणार आहे.
माध्यान्ह भोजनासाठीचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराची अद्याप निवडच केली नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर शाळा स्तरावर मिळालेल्या निधीतून साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आदेश आहेत. येत्या काही दिवसांत मुख्याध्याकांसह शिक्षक हातात पिशव्या घेऊन बाजारात दिसले तर यात काही नवल वाटू नये, जनगणना, निवडणूक आयोगाची कामे, विविध शासकीय सर्वेक्षणाबरोबरच आता माध्यान्ह भोजनासाठी लागणारे साहित्यही शिक्षकांनाच गोळा करावे लागणार आहेत.
राज्यातील शाळांमधील मुलांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया एप्रिल ते मे दरम्यान पूर्ण होऊन ठेकेदारांमार्फत आहार पुरवठा होतो. ती आजपर्यतची प्रक्रिया होती. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे माध्यान्ह भोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
निविदा काढून पोषण आहाराचे साहित्य पुरविण्याचे काम कंत्राटदारामार्फत करून घेण्यात येते. या कंत्राटदारामार्फतच राज्यातील ८० हजार शाळांना साहीत्य पुरवठा केला जातो. मात्र शासनाकडृून कंत्राटदारच निवडला न गेल्यामुळे शाळांना साहित्य पुरवठा बंद झाला आहे. यामुळे अनेक शाळांमधील साहित्य संपला असून माध्यान्ह भोजनासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळेत दिल्या जाणाºया निधीतून मुख्याध्यापकांनी साहित्य खरेदी करून माध्यान्ह भोजन देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशैक्षणिक कामात भर पडली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याच्या वेळात खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांनी ज्ञानार्जन करावे की बाजारात पिशव्या घेऊन फिरायचे हा प्रश्न पडला आहे. दुकानदार उधार किती दिवस देतील. शासनाच्या या निर्णयामुळे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
- राजेश सावरकर,
मुख्याध्यापक

शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्याने अध्यापनासाठी वेळ मिळत नाही. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच काम दिले जावे, माध्यान्ह भोजनासाठी शासनाने स्वतंत्र्य यंत्रणा उभारावी.
- किरण पाटील, सरचिटणीस
प्राथमिक शिक्षक संघ
 

Web Title:  Teachers came to the market to provide nutrition