जयंत पाटलांसमक्ष तालुकाध्यक्षांनी वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:51+5:302021-02-06T04:20:51+5:30

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, जयंत ...

The taluka president read out the complaints before Jayant Patel | जयंत पाटलांसमक्ष तालुकाध्यक्षांनी वाचला तक्रारींचा पाढा

जयंत पाटलांसमक्ष तालुकाध्यक्षांनी वाचला तक्रारींचा पाढा

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष तथा पदाधिकाऱ्याशी संवाद साधला असता ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणीवर अनेकांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्याने बांधणी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात बाहेरील कुणीही व्यक्ती आतमध्ये प्रवेश करू नये, अशी ‘फिल्डिंग’ स्थानिक नेत्यांनी लावली होती. एवढेच नव्हे तर संवाद मेळाव्याच्या छायाचित्रणावरही मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जो काही संवाद असेल तो चार भिंतीच्या आत असावा, अशी रणनीती ना. जयंत पाटील यांनी आखली होती. असे असले तरी तालुकाध्यक्षांच्या मनात जिल्ह्यातील नेत्यांबाबत असलेली खदखद अखेर बाहेर काढली. थेट ना. पाटील यांच्यासमोर गुरुवारी दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील मतभेद पुढे आले. अचलपूर, मेळघाट, चांदूर बाजार आणि मोर्शी, वरूड तालुक्यातही हीच स्थिती त्यांनी अनुभवली. मेळाव्यात अत्यल्प गर्दी बघून ना. पाटील यांना आपण सत्तेत आहो की नाही, असा प्रश्नदेखील पडला. तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पक्ष संघटन बांधणीसंदर्भात ना. पाटील हे ‘क्रॉस चेकिंग’ करण्यास विसरले नाहीत. अमरावती महानगरातील आढावा येथील अभियंता भवनात घेण्यात आला. बुधवारी भातकुली, तिवसा, अमरावती तालुक्याचा आढावा घेतला. एकूणच जयंत पाटील यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी परिवार संवादातून अंतर्गत मतभेद असल्याचे दिसून आले.

Web Title: The taluka president read out the complaints before Jayant Patel