ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:13 PM2021-12-22T15:13:55+5:302021-12-22T17:48:43+5:30

ग्रामीण भागात सद्या घरोघरी तुरीचा सोलेभाजी महोत्सवच सुरू आहे. आमच्या घरी आज सोलेभाजी केली, असे एकीने म्हटले की दूसरी लगेच म्हणते, आमच्या घरी त आतापर्यंत तीन चार झाल्या. एवढी ही भाजी वहऱ्हाडात आवडीची आहे.

special seasonal dishes made from fresh tur in vidarbha in winter season | ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव'

ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव'

googlenewsNext
ठळक मुद्देजिभेवर रेंगाळत राहत नव्हाळी

सुदेश मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : ग्रामीण भागातील शेतशिवारात तुरीचे पीक उदंड फुलोरले असून, जेथे शेंगा टंच भरल्या, तेथे घराघरात सोलेभाजीचा महोत्सव सुरू आहे. वऱ्हाडी खासियत असलेली ही सोलेभाजी तुरीच्या शेंगा सुकेपर्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुगरण गृहिणी बनवितात आणि आपसात संवाद साधताना त्याचा गौरवाने उल्लेखही केला जातो.

ग्रामीण भागात सद्या घरोघरी तुरीचा सोलेभाजी महोत्सवच सुरू आहे. आमच्या घरी आज सोलेभाजी केली, असे एकीने म्हटले की दूसरी लगेच म्हणते, आमच्या घरी त आतापर्यंत तीन चार झाल्या. एवढी ही भाजी वऱ्हाडात आवडीची आहे. या मोसमी भाजीची चवच न्यारी असल्याने भल्याभल्यांना ही भाजी भुरळ घालते. या झणझणीत व चवदार भाजीला भाकरीसोबत खाणाऱ्याला तर स्वर्गीय आनंदाची प्राप्ती होते. खाणाऱ्याची जीभ फक्त चोखंदळ व रसिक असली पाहिजे, हीच अपेक्षा असते.

 नाना भागात नाना तऱ्हा

सोलेभाजी ग्रामीण भागात सर्वदूर वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पातळ सोलेभाजी, सोले वांगे, सोले भात, सोले उसळ, सोले कचोरी आदी पद्धतीने या भाजीचा आस्वाद घेतला जातो. कितीही खाल्ली तर मन भरतच नाही म्हणून अगदी मिठासोबत उकळूनही, उन्हात बसून गप्पा मारत या शेंगा ग्रामीण भागात आवडीने खाल्ल्या जातात.

पेंडाला नाही कशाचीही सर

थंडीच्या दिवसात घरातले भुकेली माणसे या भाजीच्या फोडणीचा ठसका बसला की, जाम खुश होऊन जेवण तयार होण्याची वाट पाहत बसतात. गृहिणी तन्मयतेने तव्यावर तेल टाकून हिरव्या मिरच्या भाजतात आणि अदक लसणाबरोबर त्याचे वाटण करतात. हाच 'पेंड' या सोलेभाजीचा प्राण आहे. इतर कोणत्याही कंपनीच्या मसाल्याची सर या पेंडाला येत नाही. अशी भाजी एकदा तयार झाली की, डोक्यातल्या केसांमध्ये घाम फुटेपर्यंत ती ओरपली जाते.

ओरबाडून आणल्या जातात शेंगा

गमतीचा भाग असा की, शहरी भागात विकत मिळत असल्या तरी खेड्यापाड्यात या शेंगा यावरातून ओरबाडूनच आणल्या जातात. तुरीचे पीक विपुल असल्याने कुणी त्या नेण्याची मनाईसुद्धा करीत नाही. यंदाच्या मोसमात अगदी नव्हाळी फिटेपर्यंत ही भाजी जिभेवर राज्य करणार आहे. हे मात्र नक्की

Web Title: special seasonal dishes made from fresh tur in vidarbha in winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.