सेमाडोह स्टेट बँक शाखेत मद्यपी कर्मचाऱ्यांचा आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:28+5:302021-02-05T05:32:28+5:30

चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील स्टेट बँक शाखेत शुक्रवारी काही कर्मचारी बँकेला टाळे लावून आत आराम करीत असल्याचा संतापजनक ...

Relaxation of alcoholic staff at Semadoh State Bank branch | सेमाडोह स्टेट बँक शाखेत मद्यपी कर्मचाऱ्यांचा आराम

सेमाडोह स्टेट बँक शाखेत मद्यपी कर्मचाऱ्यांचा आराम

चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील स्टेट बँक शाखेत शुक्रवारी काही कर्मचारी बँकेला टाळे लावून आत आराम करीत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. ते मद्याधीन असल्याची तक्रार संतप्त आदिवासींनी तहसीलदार व वरिष्ठांना यासंदर्भात तक्रार केली आहे.

सेमाडोह येथे स्टेट बँकेची शाखा असून, जवळपास त्रेचाळीस दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यांचा कारभार या बँकेतून चालतो. सेमाडोह येथे येण्यासाठी नागरिकांना पहाटे पाच वाजता, तर काहींना आदल्या दिवशी यावे लागते. आदिवासी शेतकऱ्यांना कृषिकर्जासह विविध कामांसाठी व कर्जासाठी प्रचंड मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, प्रसंगी अरेरावी शिवीगाळ केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

-----------

पैसे द्या आणि पैसे घ्या

चिखली, रायपूर ,पाटकहु, केशरपूर, व इतर पाड्यांतून शुक्रवारी आदिवासी आले होते. त्यांना संबंधित व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच तुच्छतेची वागणूक दिली. ऑनलाइन कर्जमाफी असतानाही मागील सहा महिन्यांपासून बँकेत प्रत्यक्ष कर्ज दिले जात नसल्याचा गंभीर आरोप आदिवासींनी केला. त्यासाठी नावाची यादी आली नाही, वयोमान झाले आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगितली जातात. कर्ज मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बॉक्स

दारूच्या नशेतच बँकेचा कारभार

बँकेचा मुख्य दरवाजा गुरुवारीदेखील बंद करून कामकाज सुरू होते. बाहेर मोठ्या प्रमाणात आदिवासींना ताटकळत ठेवण्यात आले, तर आत कर्मचारी दारू पिऊन झोपले होते. त्यासंदर्भात तहसीलदार माया माने व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्यासह लक्ष्मीनारायण भासकर, वासुदेव मेटकर, हिराजी बेलसरे, बब्बू बर्वे, मोहनदास मेटकर अशा विविध शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले.

-------------

सेमाडोह येथील स्टेट बँक शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्जासह विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली असून, संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे.

- माया माने, तहसीलदार, चिखलदरा

-------------

जिल्हा व्यवस्थापक महत्त्वपूर्ण बैठकीत दिवसभर व्यस्त आहे. सेमाडोह शाखेतील संबंधित प्रकारासंदर्भात त्यांना सांगण्यात येईल.

- उज्ज्वल डेकाटे, सहायक व्यवस्थापक, अमरावती

Web Title: Relaxation of alcoholic staff at Semadoh State Bank branch