सकाळपासून प्रदूषण अन् कर्णकर्कश्श आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:05+5:30

श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग होऊ लागली आहे. नातेसंबंधावर त्याचा परिणाम पडू लागला आहे, अशी तक्रार त्या भागातील रहिवाशांंची आहे.

Pollution since morning | सकाळपासून प्रदूषण अन् कर्णकर्कश्श आवाज

सकाळपासून प्रदूषण अन् कर्णकर्कश्श आवाज

Next
ठळक मुद्देघरी मिळे ना क्षण शांततेचे : चिवडा कारखान्याने केले जगणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘तुमची पहाट झुळझुळ वाऱ्याने आणि शुद्ध हवेने होते ना? सकाळची मंजुळ शांतता तुम्हाला रोज ताजेतवाने करते ना? पण, आमचा हा नैसर्गिक अधिकार गेली अनेक वर्षे हिरावून घेण्यात आला आहे. नाकातून थेट मेंदूत जणारा उग्र वास, प्रदूषित झालेली हवा, डिझेलचा धूर आणि यंत्राचा कर्णकर्कश्श आवाज हीच आमच्यासाठी सकाळ आहे.’
श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग होऊ लागली आहे. नातेसंबंधावर त्याचा परिणाम पडू लागला आहे, अशी तक्रार त्या भागातील रहिवाशांंची आहे.
तक्रारीनुसार, जैन चिवडा नावाने अमरावतीत वितरित केले जाणारे चिवड्याचे उत्पादन त्या कॉलनीतील एका राहत्या घरात केले जाते. गृहउद्योगाच्या नावावर सुरू करण्यात आलेला सदर उद्योग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच यंत्रांचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. यंत्रांसाठी डिझेलचा वापर सुरू झाला आहे. चिवड्यातील घटक तळण्यासाठी तेल वापरले जाते. उकळत्या तेलाची वाफ, डिझेलचा धूर, चिवड्याचे हवेत पसरणारे कण यामुळे असह्य वास परिसरात धुमसत राहतो. यंत्रांच्या आवाजामुळे कानठळ्या बसतात. विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. वयस्कांना गुदमरल्यासारखे होते. प्रकृती बिघडलेली असताना घरात राहणे नकोनकोसे होते. आपल्याच घरात शांत, निवांत दोन क्षण बसता येत नाही. पदरमोड करून, पोटाला चिमटा घेऊन, आम्ही हयातभराची मिळकत तेथे घर उभे करण्यात घालविली आणि त्या नियमबह्य कारखान्याने आमचे आयुष्यच असे अडगळीत आले आहे.

लॉकडाऊनमध्येही उत्पादन सुरूच
सदर कारखाना टाळेबंदीच्या काळातही सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. या कारखान्यात नियमित १० कामगार येत असून, मालाची ने आण करण्यासाठी सतत मनुष्य आणि वाहनांचा राबता असतो. त्यामुळे कोविडच्या नियमावलीला हरताळ फासला गेला, शिवाय रहिवासी भागात सतत बाहेरील लोकांचा राबता असल्याने असुरक्षितताही निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मागणी काय?
छाया गजानन चुंबळे यांच्या मालकीचा तो कारखाना आहे. तो रहिवासी भागात आहे. सदर कारखाना चुंबळे यांनी औद्यागिक क्षेत्रात हलवावा. ते स्वत:हून हलवित नसतील, तर प्रशासनाने त्यांना तशी सक्ती करावी. रहिवासी भागात सुरू असलेल्या उद्योगाला तात्काळ सील लावावे.


साऱ्यांनाच केल्या तक्रारी
जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री, पोलीस ठाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अशा साºयांकडेच तक्रारी करून चुकलो. थातूरमरतूर कारवाई केली, की पुन्हा सारे 'जैसे थे'.

१० दिवस सील
तक्रार केल्यावर महापालिकेने कारखान्याला १० दिवसांसाठी सील लावले खरे; परंतु नंतर ते उघडले कसे, हे गूढच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तोशेरे ओढले आहेत.


आवाज येतो ते खरे आहे; तथापि त्यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. दुर्गंधी आणि धूर मात्र निघत नाही. लहानसा गृहउद्योग आहे. केवळ चार तास काम होते. आमचा व्यवसाय नियमसंगत आहे. नागरिकांनी आमच्याशी चर्चा करावी. आमच्यावर कर्ज आहे. उद्योग हलविला तर ते कोण फेडणार?
- छाया चुंबळे, चिवडा उत्पादक


कोण घेणार दखल?
एका वस्तीतील नागरिक एका उद्योजकाने वेठीस धरले आहेत. अखेरपर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. जिल्हाधिकारी सांगतात, हा विषय महापालिकेचा आहे; महापालिका कायमस्वरूपी उपाय योजत नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ अहवाल देते, आमदार रवि राणा हे 'हो बघतो' असे केवळ आश्वासन देतात. विषय अखत्यारीत येत नाही, असे राजापेठ पोलीस सांगतात. कर्तव्याला जागून या मुद्द्याची दखल कोण घेते, हे कळेलच.

Web Title: Pollution since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.