विद्यार्थी सक्षमीकरणासाठी संस्थांची भूमिका महत्त्वाची

By Admin | Updated: September 6, 2016 00:17 IST2016-09-06T00:17:57+5:302016-09-06T00:17:57+5:30

विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्याला जास्तीत-जास्त सुविधा कशा पुरविता येतील,...

Organizational role is important for student empowerment | विद्यार्थी सक्षमीकरणासाठी संस्थांची भूमिका महत्त्वाची

विद्यार्थी सक्षमीकरणासाठी संस्थांची भूमिका महत्त्वाची

 विद्यापीठात सभा : संस्थाध्यक्ष, सचिवांची उपस्थिती
अमरावती : विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्याला जास्तीत-जास्त सुविधा कशा पुरविता येतील, त्याचा सर्वांगीण सक्षम विकास कसा करता येईल, यासाठी संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाध्यक्ष, सचिवांची सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर विदर्भ संस्थाचालक संघाचे सचिव मोहन पावडे, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले, परीक्षा नियंत्रक जे.डी.वडते, उपकुलसचिव अशोक चव्हाण, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे उपस्थित होते.
विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ करण्याचे अधोरेखित करून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवावयाच्या आहेत. अशा सगळ्या योजनांची माहिती संस्थाध्यक्ष, सचिवांना व्हावी आणि त्यांच्या सूचनेतून व विचारातून विद्यार्थीहितार्थ योजना सक्षमपणे राबविता याव्यात, असा उद्देश असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
राजेश जयपूरकर यांनी यावेळी फंडिंग एजन्सीच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा अधिकाधिक लाभ महाविद्यालयांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. कुलसचिव अजय देशमुख यांनी स्वागतपर व प्रास्ताविक भाषणातून सहविचार सभा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विदर्भ संस्थाध्यक्ष चालक संघाचे अध्यक्ष मोहन पावडे यांनी संस्थेला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्यात. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत विनंती केली.
विद्यापीठाच्या विविध विभागांशी संबंधित योजना संदर्भातील माहितीचे सादरीकरण करून संस्थाध्यक्ष व सचिवांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. प्रौढ, निरंतर व शिक्षण विभागाच्या योजना संचालक श्रीकांत पाटील यांनी, विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांनी, विद्यापीठ ग्रंथालय विषयक माहिती ग्रंथापल मोहन खेरडे यांनी, परीक्षे संदर्भात परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांनी व महाविद्यालयीन विभागाची माहिती उपकुलसचिव अशोक चव्हाण यांनी दिली. संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Organizational role is important for student empowerment