अर्थ समितीची सभा, गैरहजर खातेप्रमुखांना शो कॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:11+5:302021-03-04T04:23:11+5:30

जिल्हा परिषद; सभापतींसह सदस्यांनी घेतला ठराव अमरावती : जिल्हा परिषद अर्थ विषय समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी दुपारी ...

Finance Committee meeting, show cause to absent department heads | अर्थ समितीची सभा, गैरहजर खातेप्रमुखांना शो कॉज

अर्थ समितीची सभा, गैरहजर खातेप्रमुखांना शो कॉज

जिल्हा परिषद; सभापतींसह सदस्यांनी घेतला ठराव

अमरावती : जिल्हा परिषद अर्थ विषय समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी दुपारी १ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. वित्त समितीचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे सभेचे अध्यक्ष होते. यावेळी बांधकाम, महिला व बालकल्याण आणि कृषी विभागाचे खातेप्रमुख गैरहजर राहिल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गैरहजर विभागप्रमुखांना ‘शो कॉज‘ देण्याचे आदेश सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी मुख्यलेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले. सभेला गैरहजर अधिकाऱ्यांवर सीईओंनी कारवाई करावी, असा ठरावसुध्दा वित्त समितीने पारित केला.

शासकीय आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता केवळ २६ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर झेडपी वित्त विषयक समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील आर्थिक वर्षातील जमा खर्चाचा आढावा घेण्यासाठी या सभेत विभागप्रमुखांना हजर राहण्यासंदर्भात पत्राव्दारे कळविले होते. त्यानुसार, वरील तीन विभागाचे अधिकारी नाही अन् त्यांचा प्रतिनिधीसुध्दा सभेला हजर नसल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सभेत समाजकल्याण, पशुसंवर्धन, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आदी विभागाला जिल्हा सेस फंडातून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी किती निधी खर्च झाला अन् किती निधी अखर्चित आहे, याचा इत्यंभूत आढावा सभापती व सदस्यांनी घेतला. याप्रसंगी संबंधित खातेप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, बराचसा निधी खर्च झाल्याचे सांगितले. मात्र, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधीचा खर्च संथगतीने खर्च होत असल्याचे आढाव्यात निर्दशनास आले. सभेला सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सदस्य दिनेश टेकाम, राजेद्र बहुरुपी, बन्सी जांबेकर, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, विभागप्रमुख शिरीष तट्टे, विजय राहाटे, ई.झेड खान, दिलीप रणमले, सुधीर जिरापुरे, जितेंद्र गजबे, वित्त विभागाचे मनीष गिरी, प्रज्ज्वल घोम, दिनेश वनवे आदी उपस्थित होते.

Web Title: Finance Committee meeting, show cause to absent department heads