अंजनगाव सुर्जी येथील डीपी रोड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:53+5:302021-02-05T05:30:53+5:30

गणेशनगरवासीयांच्या मागणीला यश, धुळीमुळे आरोग्याच्या वाढल्या होत्या तक्रारी वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : दोन वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या डीपी ...

DP Road at Anjangaon Surji closed for traffic | अंजनगाव सुर्जी येथील डीपी रोड वाहतुकीसाठी बंद

अंजनगाव सुर्जी येथील डीपी रोड वाहतुकीसाठी बंद

गणेशनगरवासीयांच्या मागणीला यश, धुळीमुळे आरोग्याच्या वाढल्या होत्या तक्रारी

वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : दोन वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या डीपी रोडमुळे कामामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांना श्वास घेणेसुध्दा कठीण झाले आहे. नागरिकांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे डीपी रोडवरील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

अंजनगाव सुर्जी शहरातील नवीन बसस्थानक ते पान अटाईपर्यंत शहराला जोडणारा डीपी रोड हा मुख्य रस्ता आहे. दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली होती. स्थानिक पालिका प्रशासनाने ३ मीटर रुंदीचे डांबरीकरण फोडून रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी बांधकाम सुरू केले. मात्र, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कामावर डांबरीकरण केव्हा होणार, याची आता प्रतीक्षा होत आहे. खडीकरण केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने रस्त्यालगतची घरे दररोज धुळीने माखतात. त्यामुळे त्रासून हा रस्ता कायमस्वरूपी बंद करावा, अशा आशयाचे निवेदन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाला दिले होते. परंतु, त्याबाबत निर्णय होत नव्हता. अखेर नागरिकांनी रस्ता बंद करा, अन्यथा आम्ही करू, असा निर्वाणीचा इशारा नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने १ फेब्रुवारीला हा रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद केला.

------

प्रतिक्रिया

रस्ता खडीकरण झाल्यानंतर लवकरच डांबरीकरण होने अपेक्षित होते. परंतु, कोविड-१९, त्यानंतर आलेल्या दोन निवडणूक आचारसंहिता यामुळे कामात विलंब झाला. आता दोन-तीन दिवसांत प्रशासकीय मान्यता मिळण्याची अपेक्षा असून, लवकरच कामाला सुरुवात होईल, असे पालिका अभियंता थेलकर यांनी सांगितले.

Web Title: DP Road at Anjangaon Surji closed for traffic