Dead goat livestock deputy commissioner | मृत शेळी पशुधन उपायुक्तांच्या दालनात
मृत शेळी पशुधन उपायुक्तांच्या दालनात

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पशुवैद्यकाच्या गैरहजेरीमुळे पशुधन दगावल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने १६ हजार रुपये किमतीची शेळी दगावली. या प्रकाराने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने मृत शेळी अमरावती येथील पशुसंवर्धन सहउपायुक्त राजेंद्र पेठे यांच्या दालनात आणली.
रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे. या ठिकाणी असलेल्या शेळ्यांपैकी एक, राजस्थान येथून आणलेली १६ हजार रुपये किमतीची शेळी आजारी पडली. तिच्यावर बेलोरा व चांदूर बाजार येथील पशुदवाखान्यात उपचारासाठी आणले. सदर शेळीची प्रकृती अधिकच खराब झाल्यामुळे पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने शेळी दगावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी अशाप्रकारे उपचाराअभावी गाय दगावली होती. पशुवैद्यकीय मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, याकरिता चार सदस्यीय समिती नेमावी, अशी मागणी रवि पाटील यांनी पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांच्याकडे केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली.

मुख्यालयी राहण्याचे आदेश
जिल्हाभरातील पशुदवाखान्यामध्ये नियुक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत कळविण्याचे आदेश पशुसंवर्धंन उपायुक्त यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय कुठल्याही पशुधनाची गैरसोय होऊ नये, याकरिताही सक्त ताकीद दिली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाचे सर्वच ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. उलट, घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे.
- रवि पाटील, शेतकरी तथा पशुपालक

Web Title: Dead goat livestock deputy commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.