कापूस ८१०० रुपये पार.. सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम; अजून किती वाढण्याची शक्यता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:09 IST2026-01-15T16:05:03+5:302026-01-15T16:09:56+5:30
Amravati : केंद्र शासनाने कापसावर १ जानेवारीपासून १ टक्के आयात शुल्क पूर्ववत केले. याचदरम्यान सरकीची दरवाढ झाल्याने देशांतर्गत कापसाला उठाव आला.

Cotton crosses Rs 8100.. Result of rise in price of raw material; How much more is it likely to increase?
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने कापसावर १ जानेवारीपासून १ टक्के आयात शुल्क पूर्ववत केले. याचदरम्यान सरकीची दरवाढ झाल्याने देशांतर्गत कापसाला उठाव आला. बुधवारी अमरावती बाजारात पहिल्यांदा कापसाचे दर ८१०० रुपये क्विंटलवर पोहोचले. शिवाय ३८ टक्क्यांवर झडती असलेला कापूस ८,४५० रुपये क्विंटल दराने विकला गेल्याची माहिती आहे.
केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने परदेशातील कापसाची आवक वाढून देशांतर्गत कापसाला फटका बसला होता. १ जानेवारीपासून केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क पूर्ववत केल्याने कापसाला पुन्हा उठाव आला आहे. तत्पूर्वी, शेतकरी हमीभावाचे संरक्षण मिळण्यासाठी 'सीसीआय' कडे वळला, तर तेथेही आर्द्रतेचे कारण देत दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
दरवाढीवर या घटकाचा परिणाम
केंद्र शासनाने १ जानेवारीपासून कापसावरील ११ टक्के आयातशुल्क पूर्ववत केल्याने परदेशातील आयातीवर परिणाम होऊन देशांतर्गत उठाव आला. सरकीच्या दरात तेजी आलेली आहे. त्याचवेळी दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी कापसाची साठवणूक करीत असल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी कापसाची दरवाढ झालेली आहे.
'सीसीआय'ला फटका
खुल्या बाजारात दरवाढीचा फटका जिल्ह्यातील 'सीसीआय'च्या १५ खरेदी केंद्रांना बसला आहे. अमरावती येथील केंद्रावर ६ ते ७ हजार क्विंटलऐवजी ५०० ते १००० क्विंटल आवक होत आहे.
कापसाची जिल्हास्थिती (रु/क्विं.)
कापसाचे दर - ७,९०० ते ८,१००
३८ टक्के झडतीवर - ८,४०० ते ८,५००
सरकीचे दर - ४,२०० ते ४,३००
रुईचे दर - १५५ रु/किलो
कापसाचे बाजारभाव (रु/क्विं.)
अमरावती - ७,९०० ते ८,१००
सावनेर - ७,८५० ते ७,९००
अकोला - ७,७८९ ते ८,०१०
वर्धा - ७,६०० ते ८,२००
घाटंजी - ७,७१५ ते ८,३००
हिंगणघाट - ७,५०० ते ८,३५०