बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:52+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एमबीए विभाग, रसायनशास्त्र विभाग, क्रिकेट मैदान आदी विद्यापीठ परिसरात दिसून आले आहेत.

Communication outside the University | बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार

बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार

Next
ठळक मुद्देशिकारीसाठी नागरी वस्तीत शिरकाव : विद्यापीठात श्वानांची संख्या झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गेल्या दोन वर्षांपासून वडाळी, पोहरा जंगल ते विद्यापीठ असा प्रवास करणाऱ्या बिबट्याने आता नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुत्र्यांच्या शिकारीसाठी येणाऱ्या बिबट्याला आता सावज मिळत नसल्याने त्याने विद्यापीठाबाहेरील रस्ता धरल्याचे घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निदर्शनास आली. बिबट्या शिकारीसाठी विद्यापीठाच्या बाहेर पडला असून, तो भविष्यात मनुष्यासाठी धोकादायक ठरणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एमबीए विभाग, रसायनशास्त्र विभाग, क्रिकेट मैदान आदी विद्यापीठ परिसरात दिसून आले आहेत. विद्यापीठात बिबट्याची ये-जा नेहमीचीच झाली आहे. तथापि, २४ ऑक्टोबरला सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या बाहेरील भागात दंत महाविद्यालय मार्गालगतच्या एका घराच्या भिंतीशेजारी शिकारीसाठी दडून बसला होता. विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचारी दीपक पाटील हे यावेळी सायकलने वडाळी येथे आपल्या घरी निघाले होते. याचवेळी मागाहून आलेल्या दुचाकीच्या आवाजाने गोंधळलेल्या बिबट्याने लांब उडी घेतली आणि पाटील यांच्या सायकलपुढून एसटी महामंडळाच्या कार्यशाळेच्या दिशेने गडप झाला. बिबट्या अचानक पुढून गेल्याने माझी भंबेरी उडाली होती, असे दीपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यापीठाच्या दर्शनी भागापुढील हा मार्ग वर्दळीचा असून, येत्या काळात या भागातील नागरी वस्त्यांमधील रहिवाशांसाठी बिबट्यांचा वावर ही बाब धोकादायक मानली जात आहे.

चालकाने एटीएमजवळ बघितला बिबट
विद्यापीठात बॅक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ बिबट्या रस्त्याने जात असल्याचे चालक म्हणून कार्यरत महेंद्र देशमुख यांनी २४ ऑक्टोबरला बघितले. एटीएम हा परिसर परीक्षा विभागानजीक आहे. या भागात सतत वर्दळ असते. बिबट्या शिकारीसाठी तलाव परिसरातून कुलगुरू बंगला, मुलींचे वसतिगृह व पुढे उद्यान विभाग असे मार्गक्रमण करीत असल्याचा अंदाज आहे.

कंत्राटी कर्मचारी पाटील यांच्या सायकलसमोरून बिबट्याने उडी घेतल्याची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. बिबट्या विद्यापीठाबाहेरील भागात आल्याने ही बाब येत्या काळात नागरी वस्त्यांसाठी धोक्याची ठरणारी आहे. विद्यापीठात कुत्र्यांची संख्या रोडावली असो वा नसो, बिबट्याचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे.
- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सुरक्षा विभाग, विद्यापीठ

Web Title: Communication outside the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.